संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे विश्वगौरव विभूषित महायोगी प. पू. स्वामी श्री चैतन्य गगनगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून आणि कृपाशीर्वादाने ८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्ती, संस्कार, कृषी, अध्यात्म आणि समाजप्रबोधन यांचा सुवर्णसंगम असलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण संगमनेर तालुका आणि पंचक्रोशीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
दिनांक ८ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत हा सोहळा रंगणार आहे. या सप्ताहात दररोज सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि रात्री ७ ते १० या वेळेत सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या रसाळ वाणीतून ‘श्रीराम कथा’ भाविकांना श्रवण करायला मिळणार आहे. बुधवार, १० जून रोजी भाविकांसाठी आद्य शंकराचार्य यांच्या पवित्र पादुकांचे दर्शन हे विशेष आकर्षण असणार आहे.
केवळ अध्यात्मच नव्हे, तर समाजप्रबोधनावरही या सप्ताहात भर देण्यात आला आहे. दररोज सकाळी ११ वाजता नामवंत वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये:
१० जून: नंदकुमारजी पोवार
११ जून: इंद्रजीत देशमुख
१२ जून: डॉ. संजय मालपाणी
१३ जून: भास्कर पेरे पाटील
१४ जून: शालिनीताई देशमुख (इंदुरीकर)
दुपारी ३ वाजता होणाऱ्या कीर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. यात ह.भ.प. समाधान महाराज शर्मा, संजय महाराज पाचपोर, जयंत महाराज पाटील, विशाल महाराज खोले, सोमनाथ महाराज शास्त्री सानप, उद्धव महाराज मंडलिक आणि ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचा समावेश आहे. सप्ताहाची सांगता १५ जून रोजी इंदुरीकर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल.
या सप्ताहाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अध्यात्मासोबतच आधुनिक शेतीची जोड देण्यासाठी ‘गगन भरारी कृषी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. ९ जून रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी श्री नरेंद्र महाराज यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होईल. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील १०५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्रामीण संस्कृतीचा संगम येथे पाहायला मिळेल.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी एस.आर. थोरात डेअरीचे प्रमुख आबासाहेब थोरात, सप्ताह समिती प्रमुख व उद्योजक दिलीप शिंदे आणि समितीचे सर्व पदाधिकारी, गुंजाळवाडी ग्रामस्थ रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. गावोगावी जनजागृती करण्यात येत असून भाविकांसाठी सर्व सोयीसुविधा सज्ज करण्यात येत आहेत.
अधिकमासातील ‘भक्तीची पर्वणी‘
हा सोहळा अधिकमास म्हणजेच पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून गेल्या सात वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. यंदाचे हे ८ वे वर्ष असून, अधिकमासाच्या शेवटच्या आठवड्यात हा भक्तिसोहळा पार पडत असल्याची माहिती दिलीप शिंदे आणि आबासाहेब थोरात यांनी दिली. आध्यात्मिक ऊर्जा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा सोहळा सर्वांसाठी पर्वणी ठरणार आहे.