{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

 

लोणी । झुंझार न्यूज 

 


अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी (ता. राहता) परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तालुक्यातील चंद्रपूर गावातील साठवण तलावात गुरुवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या ‘पायरेन्स आयबीएमए’ (IBMA) कॉलेजच्या तीन एमबीए विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २८ मे) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात आणि परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, लोणी येथील पायरेन्स आयबीएमए कॉलेजमध्ये एमबीए (MBA) द्वितीय वर्षात शिक्षण घेणारे काही विद्यार्थी गुरुवारी दुपारी चंद्रपूर शिवारातील साठवण तलावाच्या परिसरात फिरण्यासाठी गेले होते. उन्हाचा कडाका असल्याने आणि निसर्गरम्य परिसर असल्याने काही विद्यार्थी तलावाच्या पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा आणि पाण्याखाली असलेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तिघे जण अचानक बुडू लागले.

सोबत असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांना बुडताना पाहून आरडाओरडा केला आणि मदतीसाठी हाक मारली. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून परिसरातील शेतात काम करणारे स्थानिक नागरिक तातडीने तलावाकडे धावले. त्यांनी पाण्यात उडी मारून विद्यार्थ्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, परंतु पाण्याची खोली अधिक असल्याने आणि घटनेत बराच वेळ निघून गेल्याने तिघांनाही वाचवण्यात यश आले नाही.

या भीषण दुर्घटनेत मृत्यू पावलेले तिन्ही तरुण उच्चशिक्षित असून त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे. मृतांची नावे खालीलप्रमाणे आहेत

 

१. अभिषेक गंगाधर जाधव (वय २४, रा. सुरेगाव शिंगणापूर, ता. नेवासा)
२. प्रवीण प्रभाकर रसाळ (वय २३, रा. रामनगर, छत्रपती संभाजीनगर)
३. महेश अशोक शिंदे (वय २६, रा. संत ज्ञानेश्वर नगर, छत्रपती संभाजीनगर)

 


घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेची नोंद लोणी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


चंद्रपूर येथील साठवण तलावाच्या परिसरात पर्यटनासाठी किंवा फिरण्यासाठी अनेक तरुण येत असतात. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना किंवा धोक्याच्या सूचना देणारे फलक नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. अशा धोकादायक ठिकाणी प्रशासनाने कुंपण घालावे किंवा सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

एकाच वेळी तीन तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने लोणी शहरासह त्यांच्या मूळ गावी आणि मित्रपरिवारात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. भविष्यात मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून शिक्षणासाठी आलेल्या या तरुणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *