मुंबई । झुंझार न्यूज

अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. शरद पवार गटाचे खंबीर नेतृत्व, माजी राज्यमंत्री आणि जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी अखेर अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, एका बाजूला राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डीले यांचा विजय निश्चित करत असतानाच, दुसरीकडे तगड्या विरोधकालाच आपल्या गोटात खेचून आणण्याची किमया डॉ. सुजय विखे पाटील यांनी साधली आहे. या ‘डबल स्ट्राईक’मुळे जिल्ह्याच्या राजकारणात विखेंचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून डॉ. सुजय विखे पाटील हे या संपूर्ण घडामोडींचे मुख्य सूत्रधार ठरले आहेत.


मुंबईत रंगला पक्षप्रवेशाचा सोहळा

मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राजक्त तनपुरे यांनी हाती कमळ घेतले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह राहुरी, नगर आणि पाथर्डी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


डॉ. सुजय विखेंची चाणक्य नीती

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डीले यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांच्या विजयासाठी निर्णायक वातावरण तयार करण्यापर्यंत डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोठी मेहनत घेतली होती. त्यांनी स्वतः मैदानात उतरून ११ पेक्षा जास्त सभा घेतल्या आणि कार्यकर्त्यांची फळी उभी केली. मात्र, केवळ निवडणूक जिंकणे एवढ्यावरच विखे थांबले नाहीत. मागील सहा महिन्यांपासून त्यांनी प्राजक्त तनपुरे यांच्याशी संवादाचे दरवाजे उघडे ठेवले होते. तनपुरे यांनी निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय आणि आता थेट भाजपमध्ये केलेला प्रवेश, ही डॉ. सुजय विखे पाटील यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची फलश्रुती मानली जात आहे.


दोन ‘दादां’चे अलिंगन आणि आठवला इतिहास!

या सोहळ्यातील सर्वात लक्षवेधी क्षण ठरला तो म्हणजे डॉ. सुजय विखे पाटील आणि प्राजक्त तनपुरे यांच्यातील ‘गळाभेट’. लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणारे हे दोन युवा नेते आता एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सुजय विखे यांनी तनपुरे यांना मिठी मारली, तेव्हा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. “आजोबांनंतर आता नातूही एकत्र आले,” अशी चर्चा यावेळी रंगली होती. विखे आणि तनपुरे या दोन राजकीय घराण्यांचा इतिहास सर्वश्रुत आहे, आता या नव्या युतीमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


शरद पवार गटाला मोठा धक्का

प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात शरद पवार गटाला खिंडार पडले आहे. तनपुरे यांची विधान परिषदेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून, भाजप त्यांना मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत आहे. रवींद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “तनपुरेंसारखा अभ्यासू आणि प्रश्नांची जाण असलेला तरुण नेता पक्षात आल्याने भाजपची ताकद कित्येक पटीने वाढली आहे.”


बदलणारी राजकीय समीकरणे

एकीकडे अक्षय कर्डीले यांना आमदार बनवून विधानसभेत पाठवणे आणि दुसरीकडे प्राजक्त तनपुरे यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्याला पक्षात आणणे, या विखेंच्या रणनीतीमुळे राहुरी आणि आसपासच्या मतदारसंघातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. आगामी काळात जिल्ह्यातील भाजपची पकड अधिक घट्ट करण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांचा हा मास्टरस्ट्रोक अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *