संगमनेर । झुंझार न्यूज
अकलापुर भागातील मुंजेवाडी येथील रहिवासी असणाऱ्या दिनेश कैलास कापसे यांच्या राहत्या घरामध्ये गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन जीवनावश्यक वस्तू त्याचबरोबर घराचेही मोठे नुकसान झाले आहे. या कुटुंबीयांना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून गृह उपयोगी साहित्य व किराणा देऊन मदतीचा हात दिला आहे.

अकलापुर भागातील मुंजेवाडी येथील कापसे कुटुंबीयांना यशोधन कार्यालयाच्या वतीने गृहउपयोगी साहित्य व किराणा किट देण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा अकलापुर गावचे सरपंच अरुण वाघ, बाळू कापसे, संपत आभाळे ,दत्तात्रय आभाळे, अनिता आभाळे ,यशोधन कार्यालय आदिवासी विभाग प्रमुख बाळकृष्ण गांडाळ, स्वीय सहाय्यक राजवर्धन पिसाळ, नितीन अल्हाट यांसह अकलापूर गावातील नागरिक उपस्थित होते.

दिनेश कैलास कापसे हे अकलापूर भागातील मुंजेवाडी येथील रहिवासी असून त्यांची आर्थिक परिस्थिती ही मध्यमवर्गीय आहे. त्यात त्यांच्या राहत्या घरामध्ये गॅसच्या टाकीचा स्फोट झाला व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही बातमी लोकनेते बाळासाहेब थोरात यांना समजताच त्यांनी तातडीने मदत करण्याच्या सूचना यशोधन कार्यालयाला दिल्या त्यानंतर लगेचच यशोधन कार्यालयाच्या वतीने कुटुंबांना गृह उपयोगी साहित्य व किराणा साहित्य देण्यात आले.

यावेळी अकलापूर येथील ग्रामस्थ, दिनेश कैलास कापसे व त्यांच्या कुटुंबीयांनी लोकनेते बाळासाहेब थोरात व यशोधन कार्यालयातील कृतज्ञता व्यक्त केली.
