आंदोलनाची रूपरेषा ठरणार; शेतकरी बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

 

मांचीहिल । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील गावठाण आणि शेतीसाठी मिळणारा अनियंत्रित वीज पुरवठा आणि वारंवार होणारी वीज कपात ही समस्या आता गंभीर वळणावर पोहोचली आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि शेतीला नियमाप्रमाणे किमान ६ ते ८ तास विनाखंडित वीज मिळावी, या मुख्य मागणीसाठी आज सोमवार, दिनांक २९ जून २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता ‘मांचीहिल’ येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यमान परिस्थितीत महावितरणच्या लहरी कारभारामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. पिकांना पाणी देण्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध होत नसल्याने हातातोंडाशी आलेली पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी पंचायत समिती सदस्य सरूनाथ उंबरकर यांनी पुढाकार घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक बोलावली आहे.

या बैठकीचे गांभीर्य लक्षात घेता, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि परिसरातील ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने

  • महावितरणचे कार्यकारी अभियंता (संगमनेर विभाग): श्री. वट्टमवार

  • सहाय्यक अभियंता: श्री. प्रजापती

  • शाखा अभियंता: श्री. सोनार

  • आश्वी वीज कंपनीचे पदाधिकारी: श्री. विखे

  • ज्येष्ठ नेते: शाळीग्राम होडगर

  • माजी जिल्हाधिकारी: शिवाजी जोंधळे साहेब

  • माजी पंचायत समिती सदस्य: सरूनाथ उंबरकर, गुलाबराव सांगळे

यांच्यासह परिसरातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.


वीज कंपनीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. या बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर थेट प्रश्नांचा भडिमार केला जाणार असून, विनाखंडित वीज पुरवठ्याबाबत ठोस आश्वासन घेतल्याशिवाय आंदोलनाची धार कमी केली जाणार नाही, असे संकेत आयोजकांनी दिले आहेत. बैठकीत आंदोलनाची सविस्तर रूपरेषाही निश्चित केली जाणार आहे.

आपल्या हक्काच्या विजेसाठी आणि शेतीच्या भवितव्यासाठी सर्व नागरिक व शेतकरी बांधवांनी कोणत्याही राजकीय भेदाभेद विसरून मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित राहावे. आपल्या समस्या मांडून योग्य त्या सूचना कराव्यात, असे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य सरूनाथ उंबरकर आणि गुलाबराव सांगळे यांनी केले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *