राहुरीतूनही शिवसेना (उबाठा)ला मोठा धक्का 

अहिल्यानगर जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलणार !

 

 

झरेकाठी । झुंझार न्यूज 

शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचा शिंदे शिवसेनेत संभाव्य प्रवेश होणार असल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिसून येत आहेत.


ठाकरे यांच्या शिवसेनेतील पक्षफुटीनंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये राहुरी तालुक्यातूनही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला असून ठाकरे गटाची शिवसेना पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख तथा राहुरी तालुक्यातील शिवसेनेचे प्रभावी नेतृत्वाची ओळख असलेले रावसाहेब खेवरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे या निर्णयामुळे राहुरी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.


उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदावरून पायउतार झाल्यानंतर पक्ष नेतृत्वावर नाराज असलेले खेवरे यांनी अखेर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत त्यांनी आपला राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे सोपविला असून शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त समजलेआहे.


गेल्या ४० वर्षापासून हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते म्हणून खेवरे नाना यांची ख्याती होती. त्यांच्या संपर्काच्या माध्यमातून रावसाहेब खेवरे यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन केले होते.कुठलाही दुजा भाव न ठेवता सर्वसामान्यांच्या कौटुंबिक जीवनात त्यांनी अनेक प्रकारे मदत केली होती. त्यामुळे राहुरी तालुक्यातील त्यांचा जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि संघटन कौशल्य लक्षात घेता हा प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.


ठाणे येथे रावसाहेब खेवरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यांना शिंदे गटाकडे आणण्यासाठी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा मोठा सहभाग आहे. उपजिल्हाप्रमुख सचिन बडधे, रामहरी सिकंडे, दीपक पंडित, अनिल बांगरे, मच्छिंद्र धुमाळ, सोमनाथ गोरे, सुनील शेलार, डॉ. संजय म्हसे, पोपट शिरसाठ, हरिभाऊ शेळके, राजूभाऊ झावरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे यांनी महत्त्वपूर्ण समन्वय साधला.


______________________

दरम्यान येत्या १२ जुलै रोजी शिर्डी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत रावसाहेब खेवरे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिक पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याचे खात्री लायक वृत्त समजले आहे. यावेळी रावसाहेब खेवरे हे हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे हा पक्ष प्रवेश सोहळा अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणार आहे.

______________________

 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेवरे यांच्या पक्षांतरामुळे राहुरी तालुक्यातील तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे .

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *