महिला व बालकांवरील अत्याचारांविरोधात राज्य सरकारची ठाम भूमिका
संगमनेर । झुंझार न्यूज
नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने अत्यंत गांभीर्याने दखल घेत फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी पूर्ण केली. यामुळे महिला व बालकांवरील अत्याचारांविरोधात राज्य सरकारची ठाम भूमिका स्पष्ट झाली असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेत गुन्हा घडल्यानंतर २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली. त्यानंतर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून अवघ्या दोन महिन्यांत तपास, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करत निकाल देण्यात आला. समाजात कायद्याचा धाक निर्माण करणार्या या निकालाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
दरम्यान, यासंदर्भात आमदार खताळ यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, नसरापूर प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारी आहे. राज्य सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून महिला आणि बालकांवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत, हा स्पष्ट संदेश दिला आहे.
या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला, हीच त्या निष्पाप लेकराला खरी श्रद्धांजली आहे. तसेच महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारची कठोर भूमिका अधोरेखित करणारा हा निकाल असल्याची भावना आमदार खताळ यांनी व्यक्त केली.