मागिल वर्षी समाधान कारक पाऊस व यंदा अवकाळीने पाणी साठा मुबलक
संगमनेर : झुंजार न्यूज
मागिल वर्षी पाऊस चांगला झाला असल्याने सध्या ग्रामीण भागात पाण्याची पातळी समाधान कारक आहे. २०१९ साली ७६ टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या संगमनेर तालुक्यात २०२२ मार्च महिना संपत आला तरी अद्याप एकही टँकरचा प्रस्ताव आला नसल्याचे समाधान यंदा अनुभवायला मिळाले.
गेल्या पाच सहा वर्षा पूर्वी तालुक्यात तिव्र पाणी टंचाई जाणवत होती. पावसाचे प्रमाण कमी असल्याने सातत्याने टँकरची मागणी सुरू होती. नगर जिल्ह्यात संगमनेर आणि टँकर असे समीकरण बनले होते. यामुळे दुष्काळी तालुका म्हणून ओळख बनली होती. यावर उपाय म्हणून गावागावात शेततळे मोहीम राबविण्यात आली. मागेल त्याला शेततळे देण्यात आले. अनेक गावात पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या. मागिल आठ दहा वर्षांपूर्वी व आत्ताच्या परिस्थितीत अमुलाग्र बदल झाला आहे. आ. थोरातांनी तालुक्यात विविध योजना राबवल्या परिणामी पिण्यासाठी व शेतीला पाणी उपलब्ध झाले आहे. तर मागिल वर्षी २०२१ – २०२२ ला चांगला पाऊस झाला . पाण्याची पातळी वाढली यातच अनेक भागात मार्च महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गारपीट झाली .
शेतीचे नुकसान झाले असले तरी अनेक गावात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे तालुक्यातील शेतकर्यांनी धरणातील पाण्याच्या आवर्तनाची मागणी अद्याप केली नाही . भंडारदरा व निळवंडे धरणात यंदा मोठा पाणी साठा उपलब्ध आहे. एप्रिल व मे असे दोनच महिने बाकी असून जून महिन्यात पाऊसाला चांगली सुरुवात झाली तर यंदा पुन्हा पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. अनेक भागात जमिनीत पाणी असून काही फुटावर पाणी लागते. तर अनेक ठिकाणी पाण्यामुळे जमिनी उफळल्या आहे. ही परिस्थिती समाधान कारक असल्याने यंदा मार्च महिना संपला तरी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणीचा प्रस्ताव आला नाही.
मागिल पाच वर्षांचा आढावा घेतला तर सर्वाधिक पाणी टंचाई २०१८-१९ या साली होती. ४९ गावे ३१० वाड्यांना सुमारे ७६ टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. शिवाय जानेवारी फेबुवारी महिन्यातच प्रस्ताव येण्यास सुरुवात झाली होती. ही परिस्थिती हाताळतांना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली होती. निमोण, तळेगाव दिघे व परिसर, पोनोडी शिपलापुर, पिंप्रीलौकी अजमपुर, पठार भागात साकूर , घारगाव बोटा व परिसरातील गावे वाडी वस्तीवर टँकर सुरू राहायचे. अनेक गावात वर्षानुवर्षे टंचाई जाणवत होती.
तालुक्यात २०१७ -१८ या वर्षी २१ गावे, ४८ वाड्यांना २३ टँकर सुरू होते. २०१९ – २० या वर्षी १३ गावे ३१ वाड्यांना १२ टँकर सुरू होते. तर २०२०- २१ या वर्षी ९ गावे २८ वाड्यांना १० टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. २०२१-२२ मागिल वर्षाची स्थिती पाहता २४ गावे ४८ वाड्यांना १३ टँकर सुरू होते. टँकरची लवकर मागणी होवून जून अखेर पर्यंत टँकर शक्यतो बंद व्हायला सुरूवात होती. पाच वर्षाचा टंचाई आराखडा पाहता २०१७ – १८ या वर्षी 23 टँकर तर २०१८ – १९ या वर्षी ७६ टँकर ने पाणी पुरवठा केला जात होता. नंतरच्या काळात टँकरची संख्या कमी होत गेली. यंदा परिस्थिती खूपच समाधान कारक असून पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडे एकाही गावाचा टंचाई आराखडा आला नाही. पंचायत समितीने देखील यंदा एप्रिल महिन्या पासूनच पाणी टंचाई गृहीत धरून आराखडा तयार केला आहे. यंदा उशिरा टँकर सुरू होवून ते जून जुलै तर सप्टेंबर पर्यंत सुरू राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र यंदा फारशी टंचाई जाणवणार अशीच परिस्थिती आहे.
चौकट- कधी पाणी टंचाई तर कधी अवकाळी
पाणी उपलब्ध असेल तरी अवकाळी पावसाने मात्र शेतीचे मोठे नुकसान झाले असून गहू , हरबरा, मका, सह इतर पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी मदतीची वाट पाहत आहे. तालुक्यातील शेतीची परिस्थिती हळूहळू बदलत असून पाणी टंचाई कमी जाणवत असली तरी यात सातत्याने बदल होत राहतो एखाद्या वर्षी समाधानाचे वातावरण असेल तरी दुसर्या वर्षी टंचाई दुष्काळ जाणवतो.
