डाव्या कालव्या प्रमाणेच उजव्या कालव्याचे कामही पूर्णत्वास नेणे हीच खरी कै. रखमाजी पाटील खेमनर यांना श्रद्धांजली

संगमनेर : झुंजार न्यूज  

निळवंडे उजव्या कालव्याचे काम महिनाभरात पूर्णत्वाला जात असून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना धरणासह कॅनॉलच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले आहे. डाव्या कालव्या प्रमाणेच उजव्या कालव्याचे कामही पूर्णत्वास नेणे हीच खरी कै. रखमाजी पाटील खेमनर यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

डिग्रसचे माजी सरपंच जेष्ठ नेते कै. रखमाजी पाटील खेमनर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री विखे म्हणाले की याभागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा हा भाग टॅकरमुक्त व्हावा यासाठी कै.रखमाजी खेमनर सातत्याने आग्रही होते.यासाठीच आठ कोटी रुपयांची पाणी योजना त्यांच्या पाठपुराव्यातून या गावांसाठी मंजूर झाली.निळवंडे उजव्या कालव्यांचे कामही पूर्ण करण्यासाठी त्यांची असलेली इच्छा पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली त्यांना ठरणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.
नामदार विखे पाटील पुढे म्हणाले की, धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे.येत्या पंधरा दिवसात टेस्टीग होणार असून उजव्या कालव्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे.यासाठी उभारावे लागलेले सेतूचे कामही पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

कै. रखमाजी पाटील खेमनर यांचा स्वभाव सडेतोड होता. त्यांना कोणाची भीती वाटत नव्हती. आपली मते ते परखडपणे मांडत होते. आणि म्हणूनच एक लढवय्ये नेतृत्व म्हणून या परिसरात ते परिचित होते.त्यांच्या विचारांचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवून राज्यात सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय आपण घेत आहोत.
खेमनरांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे चिरंजीव अशोक यांनी ती पोकळी भरून काढावी आणि समर्थपणे या परिसरात त्यांचा वारसा पुढे चालवावा असे विखे पाटील म्हणाले.

याप्रसंगी अँड. सदाशिवराव थोरात म्हणाले की डिग्रस परिसरात निळवंडेचे पाणी यावे म्हणून अख्खे आयुष्य खेमनर पाटलांनी पणाला लावले. आता खऱ्या अर्थाने निळवंड्याचे कॅनॉलचे पाणी या परिसरात मिळणे हीच त्यांच्या दृष्टीने त्यांना श्रद्धांजली ठरेल.

श्रद्धांजली कार्यक्रमास तालुक्यातील सर्व पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed