पाचोरा । झुंजार न्यूज
आजच्या घडीला राज्यात अनेक शिक्षणसंस्था आहेत. शिक्षण घेणं पूर्वीपेक्षा तुलनेने सोपं झालं आहे. पण दहावी-बारावी किंवा पदवी मिळवल्यावर करिअरसाठी कोणत्या वाटा निवडायच्या, याचं मार्गदर्शन मात्र विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे जगभरात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि करिअरच्या काय संधी आहेत, हे त्यांना सांगणारी यंत्रणा असायला हवी, अशी अपेक्षा आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली. जळगावच्या पाचोरा येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील कार्यक्रमात ते बोलत होते.
पाचोरा येथील मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयातील १२व्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून आमदार सत्यजीत तांबे उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब दिलीप वाघ, पाचोऱ्याचे उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनजंय येरुळे, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक राजेंद्र चिंचोले आदी मान्यवर उपस्थित होते.
भाषणाच्या सुरुवातीलाच आ. तांबे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. या विद्यार्थ्यांनी केलेली भाषणं खूप उत्स्फूर्त, अभ्यासपूर्ण आणि भाषेचा उत्तम वापर केलेली होती, असं ते म्हणाले. या मुलांनी फक्त डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, सैन्याधिकारी किंवा स्पर्धा परीक्षा एवढाच विचार करू नये. आज करिअरच्या खूप संधी उपलब्ध आहेत, पण त्याबाबत विद्यार्थ्यांना माहितीच नसते, अशी खंतही आ. तांबे यांनी व्यक्त केली.
१९३६ साली पाचोऱ्यात ही संस्था सुरू झाली, तेव्हा संस्थापकांपुढे लोकांना शिक्षण मिळण्यासाठी संस्था हवी, हा उद्देश होता. पण आता आपल्या राज्यात अनेक शिक्षणसंस्था आहेत. शिक्षण मिळणं तुलनेनं सोपं झालं आहे. पण पदवी घेतल्यानंतर कोणत्या वाटेने जायचं, आणखी पुढे कशात शिक्षण घ्यायचं, ही दिशा दाखवणारी एकही यंत्रणा आपल्याकडे नाही. संस्थेने ही गरज ओळखून त्यादृष्टीने काहीतरी काम करायला हवं. त्यांना जी मदत लागेल, ती करायला मी तयार आहे, असं आश्वासनही आमदार सत्यजीत तांबे यांनी दिलं.
आवडीही जपा!
फक्त अभ्यासावर भर देऊन आजच्या जगात फायदा नाही. माझ्या एका मित्राच्या मुलाला अमेरिकेतल्या सर्वात नावाजलेल्या MBA कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. पण तो त्याच्या मार्कांवर आधारित नव्हता. त्या मुलाला वन्यजीवनाची प्रचंड आवड होती आणि त्याचा त्याने अभ्यासही केला होता. त्याच्या या आवडीचा उपयोग त्याला या कॉलेजमध्ये प्रवेश घेताना झाला, असा अनुभव त्यांनी सांगितला.
माजी विद्यार्थी हे संस्थेचं मोठं बळ
कोणत्याही संस्थेसाठी त्यांचे माजी विद्यार्थी हे मोठं बळ असतं. हे विद्यार्थी संस्थेतून शिकून मोठे होतात. मोठमोठ्या हुद्द्यांवर जातात. त्यांच्या मनात संस्थेबद्दल ओलावा असतो. कृतज्ञतेची भावना असते. आमच्या शिक्षणसंस्थेचे अनेक माजी विद्यार्थी आज अमेरिकेतल्या मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या हुद्द्यांवर आहेत. त्यांनी एकत्र येत संस्थेच्या इंजिनिअरिंग कॉलेजसाठी पाच कोटी रुपयांची कम्प्युटर लॅब भेट दिली. तुम्ही ज्या संस्थेत शिकलात, त्यात आणखी कोणत्या गोष्टी हव्या होत्या, हे तुमच्याएवढं चांगलं कोणालाच माहीत नसतं. तुम्हीच त्या गोष्टी संस्थेला पुरवू शकता, अशी पुष्टीही आ. तांबे यांनी जोडली.
लोकसहभागाची गरज
शिक्षणसंस्थांना वेतनाशिवाय एक रुपयाही सरकारकडून मिळत नाही. अनेकदा खडूदेखील शिक्षक स्वत: घेऊन येतात. मी एखाद्या शाळेत गेलो आणि तिथे नव्या खुर्च्या दिसल्या की, मी मुख्याध्यापकांना त्या नेमक्या कशा काय विकत घेतल्या, हे विचारतो. त्यामुळे या संस्थांना विद्यार्थ्यांसाठी खूप काही करायची इच्छा असूनही आर्थिक कारणांमुळे शक्य होत नाही. अशा वेळी समाजातील लोक एकत्र येऊन संस्थेला मदत करतात. माजी विद्यार्थी पुढाकार घेतात. लोकसहभागाशिवाय अशा संस्थांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारणार नाही. – आ. सत्यजीत तांबे.
महात्मा फुले यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी
महात्मा फुले यांनी समाजाचा विरोध पत्करून स्त्री-शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. महिलांना शिकवण्यासाठी त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षिका म्हणून घडवलं. त्यांनी घेतलेल्या अपार कष्टांमुळेच आज इथे मोठ्या संख्येने मुली दिसत आहेत. तसंच गेल्या १०-१२ वर्षांतील सर्वोत्तम मार्क मिळालेल्यांच्या यादीतही ८० ते ८५ टक्के मुलीच असतात. पण एवढ्यावरच थांबायचं नाही. करिअरच्या वेगवेगळ्या वाटा निवडून त्यात यशस्वी झालो, तरच महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्वप्न आपण पूर्ण केल्यासारखं होईल, अशी सादही त्यांनी विद्यार्थिनींना घातली.
११ वी-१२ वी महत्त्वाचा टप्पा
आयुष्यात ११वी- १२ वी हा महत्त्वाचा टप्पा आहे. याच टप्प्यावर तुम्हाला योग्य मित्र निवडावे लागतात. हे मित्र एक तर तुमचं आयुष्य घडवू शकतात किंवा बिघडवू शकतात. त्यामुळे मित्रांची निवड करताना खूप काळजी घ्या. तसंच आतापर्यंत तुमच्या आयुष्यातले निर्णय तुमचे पालक घेत आले आहेत. आता ते तुमच्याशी चर्चा करून निर्णय घेतात. पण पुढल्या चार-पाच वर्षांमध्ये तुमच्या आयुष्याचे निर्णय तुम्हालाच घ्यायचे आहेत. त्यामुळे ही दोन वर्षं तुमची जडणघडण कशी होते, या दृष्टीने महत्त्वाची आहेत, असंही आ. तांबे म्हणाले.
—————
