भुईकोट किल्ल्याच्या ऐतिहासिक भूमीतून काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा प्रारंभ
अहमदनगर । झुंजार न्यूज
आपल्याला देश वाचवायचा आहे, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या देशाच्या विकासात योगदान द्यायचे आहे. अत्यंत खात्रीने सांगतो काँग्रेस आणि भारतीय संस्कृतीच देशाला वाचवू शकते. आपण सर्व एक आहोत, कुणीही लहान मोठा नाही, आपल्यात भेदभावाला थारा नाही हा विचार भारतीय संस्कृतीने आपल्याला दिला आणि तोच विचार काँग्रेस पुढे नेण्याचे काम करत आहे, जनसंवाद यात्रा ही प्रेमाचा विचार घेऊन जनमानसात जाणार आहे असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर येथे बोलताना केले.
उत्तर महाराष्ट्रातील जनसंवाद यात्रेचा शुभारंभ काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आला. अहमदनगर येथे असलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातून जनसंवाद यात्रेचा शुभारंभ झाला. ज्या वृक्षा खाली बसून पंडितजींनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला, पंडित जवाहरलाल नेहरू आणि क्रांतिकारक ज्या जागेमध्ये राहिले तेथील स्मृतींना आज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह अभिवादन केले. यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अहमदनगर येथे झालेल्या जनसंवाद सभेला संबोधित करताना थोरात म्हणाले, देशात सध्या बेरोजगारी महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्त्रि-पुरुष, सर्व जाती, धर्म, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समानतेचा अधिकार लोकशाहीने दिला आहे. सर्व जाती धर्माच्या संतांचे विचार राज्यघटनेत असून जो भारताचा नागरिक आहे त्याला मताचा अधिकार दिला आहे. मात्र या लोकशाहीच्या मूलतत्त्वांना सुरुंग लावण्याचे काम सत्ताधारी भाजपा कडून सध्या सुरू आहे. स्वायत्त संस्थांचा वापर राजकारणासाठी केला जात आहे. यामुळे लोकशाही टिकणार की नाही हा सध्या देशा पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.
देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी , महागाई वाढली आहे त्याबद्दल सरकार शब्द बोलायला तयार नाही.
मणिपूर मध्ये आदिवासी महिलांवर झालेले अत्याचार अत्यंत दुर्दैवी आहे.
मराठा समाजाच्या आंदोलन करणाऱ्यांवर लाठी चार्ज केला गेला आहे .सत्याग्रहाचा हक्क सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिला खेळाडूंनी आरोप केलेले भाजपाचे खासदार ब्रिज भूषण मोकाट आहे मात्र राहुलजी यांना साध्या बोलण्यावरून दोन वर्षाची शिक्षा सुनावली गेली त्यांची खासदारकी तातडीने काढली गेली.
चंद्रयान ही मोहीम शास्त्रज्ञांनी यशस्वी केली . या इस्रो संस्थेची स्थापना पंडितजींनी केली असून काँग्रेस पक्षाने या सर्व संस्थांची पायाभरणी केली आहे.
देशात सध्या जाती धर्मामध्ये भांडणे लावायची आणि सत्ता मिळवायची हे भाजपाकडून सुरू आहे.
काँग्रेस मात्र सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा पक्ष असून लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी सर्वांनी काँग्रेसचा विचार घराघरापर्यंत पोहोचवावा असे आवाहनही त्यांनी केले.
तर राजेंद्र दादा नागवडे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा असून सध्या सुरू असलेल्या राजकारणाला राज्यातील लोक कंटाळले आहेत. सरकार बद्दल जनतेमध्ये मोठा असंतोष असून असून आगामी काळ हा काँग्रेसचाच असेल असेही ते म्हणाले.
तर आमदार लहू कानडे म्हणाले की अहमदनगर जिल्हा हा काँग्रेसचा व पुरोगामी विचारांचा असून काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये पक्षाचा व लोकशाहीचा विचार गावागावात पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन केले. यावेळी मधुकरराव नवले, उत्कर्षाताई रुपवते, हेमंत ओगले, किरण पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव वापरे यांनी केले तर हेमंत उगले यांनी आभार मानले .यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व सेलचे सर्व पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
आ थोरात यांचे भुईकोट किल्ल्यात पंडितजींना अभिवादन
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आयुष्यातील 10 वर्षेही तुरुंगात काढली असून त्यापैकी 3 वर्ष ही अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात काढली आहे. यावेळी त्यांनी वास्तव्यात डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला असून ज्या खोलीमध्ये हा ग्रंथ लिहिला. त्या खोली व तुरुंगातील झाडाला काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व इतर पदाधिकाऱ्यांनी अभिवादन करून जनसंवाद यात्रेची सुरुवात केली
