थोरात कृषी महाविद्यालयात फादर बाकर यांचा स्मृतिदिन साजरा
संगमनेर । झुंजार न्यूज
स्विझर्लंड देशातून भारतात येऊन संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये पाणलोटाचे काम करणारे फादर बाकर व सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणारे भाऊसाहेब थोरात या तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्वांचे जीवन हे समाजासाठी समर्पित असून हे दोघेही ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असल्याचे गौरवद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे मा .आ.डॉ सुधीर तांबे यांनी काढले असून थोरात कृषी महाविद्यालयात फादर बाकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय येथे फादर हार्मन बाकर यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे होते तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ. संजय मंडकमाले, ज्ञानमाता विद्यालयाचे प्राचार्य फादर जेम्स थोरात, आदिवासी सेवक प्रा बाबा खरात, लाजरस केदारी, लॉरेन्स गायकवाड, प्राचार्य एस.टी. देशमुख ,नोडल ऑफिसर प्रा जी.बी चासकर, बाळासाहेब उंबरकर, जगन्नाथ गोडगे, लहान मुंडे, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा.आ. डॉ तांबे म्हणाले की, जगाच्या पाठीवरील सर्वात सुंदर देश असलेल्या स्वित्झर्लंड देशातून येऊन जीवनाचे ध्येय म्हणून फादर हर्मन बाकर यांनी संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात पानलोटाचे मोठे काम केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व फादर बाकर हे सेवाभावी वृत्तीचे समविचारी व तत्त्वनिष्ठ असल्याने दोघांची मैत्री जमली. त्यातून त्यांनी पाणलोट सहकाराच्या माध्यमातून मोठे काम उभे केले. फादर हर्मन बाकर यांना आपल्या ग्रामीण भागातील लोक पाणीवाले बाबा म्हणून ओळखत.
स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करताना आयुष्यभर आपली तत्त्वे जपली. अशा व्यक्तिमत्त्वांचे जीवन चरित्र हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांवर काम करणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्र हे मोठे व्यापक असून कृषीला उद्योगाचे स्वरूप दिले तर नक्कीच या क्षेत्रातही माणूस यशस्वी होतो असे गौरव उद्गारही त्यांनी काढले.
तर प्रा बाबा खरात म्हणाले की, दुष्काळी तालुका ते समृद्ध तालुका या विकासाच्या वाटचालीत स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांच्याबरोबर अनेकांचे योगदान आहे. यामध्ये पाणलोट क्षेत्रात फादर हर्मन बाकर यांनी मोठे काम उभे केले आहे.त्यांच्या स्मरणार्थ आमदार बाळासाहेब थोरात यांनी कोळवाडे येथे हरमन हिल निर्माण केली आहे. तरुणांनी हिरवाई निर्माण करावी हा संदेश या ऋषीतील व्यक्तिमत्त्वाच्या जीवनातून प्रत्येकाला मिळत असल्याचेही ते म्हणाले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ संजय मंडकमाले यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर प्रा जी.बी चासकर यांनी आभार मानले .यावेळी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
अमृतवाहिनी चे कृषी महाविद्यालय गुणवत्तेचे मॉडेल ठरेल
माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्था ही गुणवत्तेमुळे देशात गौरवली जात आहे. या संस्थेने नव्याने सुरू केलेल्या कृषी महाविद्यालयात पहिल्याच फेरीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून यामध्ये 20 मुली असणे हे अभिमानास्पद असल्याचेही ते म्हणाले
