शिर्डी । झुंजार न्यूज

 

 

महाराष्ट्राच्या समाजकारणात व राजकारणात विखे-पाटील कुटुंबाने खास शैली निर्माण केली आहे सहकाराचे दैवत स्व.डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांनी आशिया खंडातील प्रथम शेतकरी सहकारी साखर कारखाना उभारला, शेतकरी हितासाठी विविध कल्याणकारी उपाय योजना आमलात आणले पुढे सुपुत्र केंद्रीय मंत्री पद्मभूषण स्व.बाळासाहेब विखे पाटील यांनी तोच समाजकारणाचा वारसा दोन पाऊले पुढे ठेवत अंगिकारला.त्यानंतर आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही जनता केंद्रबिंदू मानून जनसेवा फाऊंडेशन च्या माध्यमातून व्यापक जनसेवेला प्राधान्य दिले.पुढे त्यांचेच सुपुत्र सद्यस्थितीत डॉ. सुजय दादा विखे-पाटील यांनी तर थेट स्व.बाळासाहेब विखे-पाटील यांच्या पायावर पाय ठेवत दोन पाऊले पुढे ठेवत सर्वांचीच मने जिंकली .
 

 

संपुर्ण महाराष्ट्रात विखे पॅटर्न, लोणी पॅटर्न,प्रवरा पॅटर्न असे सरळ बोलीभाषेत सर्रासपणे बोलले जाते. सध्या तर अहमदनगर जिल्ह्यातील तरुणाईने आणखी एक वेगळाचा पॅटर्न सुरू केला आहे तो म्हणजे “सुजय पर्व” जेव्हापासून खासदार डॉ. सुजय दादा विखे-पाटील यांनी सक्रिय राजकारणात उडी घेतली तेंव्हा पासून “सुजय पर्व” उदयास आले असे म्हटले जाते.

 

पॅटर्न म्हणजे लोकहिताचे काम करण्याची, समाजकारण व राजकारण करण्याची आगळीवेगळी पद्धत किंवा “खास शैली” असाच अर्थ यातुन निघतो. या ‘पॅटर्न’ची सुरुवात खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांचे पणजोबा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी केली. आशिया खंडातला पहिला शेतकरी सहकारी साखर कारखाना लोणीमध्ये सुरू केला विठ्ठलराव हे लोणी गावचे पाटील होते अंत्यंत साधी राहणीमान व उच्च विचारसरणी असलेले प्रखर शेतकरी नेते म्हणून नावारूपाला आलेले व्यक्तीमत्व होते. सफेद धोतर, फेटा आणि तीन बटनाचा नेहरु शर्ट असा त्यांचा पोशाख.शिक्षण जेमतेम चौथीपर्यंतच पंरतु व्यवहारज्ञान, सामाजिक बांधिलकी, लोकांच्या गरजा, भावना ओळखून त्या सोडविण्यासाठी निष्णांत व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती.

 

सहकार कृषी औद्योगिक शिक्षण, आरोग्य आणि लोकांचं जीवनमान कसं उंचावतं याचे जिवंत उदाहरण म्हणजे विखे-पाटील यांची लोणी होय.

 

पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील केंद्रीय मंत्रीपद भुषविले संसद भवनात सुद्धा पांढरी टोपी, शर्ट, पायजमा. तिन्ही पांढरे. गळ्यात मफलर. दाढीचे खुंट वाढलेलं असा पेहराव तीच लकब साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी असलेले आमदार राधाकृष्ण विखे-पाटील व त्यांचे सुपुत्र खासदार डॉ सुजय विखे-पाटील आजही हा विखे-पाटील परिवार कधीच सुटाबुटात वावरत नाही, दोघेही बापलेक साधा सफेद शर्ट तोही साधारण इस्त्री केलेला,साधी पँट असा पोशाख त्यांचा असतो.
 

 

लोकांच्या गरजा ओळखण्याचं चतुरपण, कितीही दिवसांनी भेटलेला माणुस समोर आल्यावर नावा गावांसह ओळखणे हे विखे-पाटील कुटुंबाला लाभलेली ईश्वराची किंवा निसर्गाची देणगीच आहे. लोकांची सेवा व गरजा सत्तेतून पूर्ण करता येते, म्हणून सत्तेवर मांड ठेवुन समाजकारणात सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदू मानून वीस टक्के राजकारण तर ऐंशी टक्के समाजकारण हीच त्यांची खासियत आहे.

 

विखे पाटील यांच्या कुटुंबातील स्व. बाळासाहेब विखे पाटील हे दीर्घकाळ खासदार होते. काही काळ केंद्रीय राज्यमंत्रीही होते. त्यांचे चिरंजीव आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील राज्याच्या राजकारणात, तर त्यांचे वडील देशाच्या राजकारणात होते. बाळासाहेब विखे पाटलांच्या निधनानंतर त्यांचे नातू डॉ. सुजयदादा अहमदनगर लोकसभा मतदारसंघातुन खासदार झाले आहेत. त्यामुळे ते आता देशाच्या राजकारणात सक्रीय झाले आहे, असे मानले जाते. खासदारकीची पहिलीच टर्म असतानाही त्यांनी संसदेत नुसते मतदार संघापुरतेच मर्यादित न राहता शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या ही समस्या लोकसभेत प्रभावीपणे मांडत असतात. त्यांचे कार्य कर्तृत्व नेतृत्व आणि वकृत्व या त्रिवेणी संगमामुळे लहान मोठे, युवक जेष्ठ मंडळी सुद्धा प्रभावित झाली आहे. आता सर्वसामान्य कार्यकर्ते शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील जनतेला सुजय दादांच्या मंत्रिपदाचे वेध लागले आहेत.

 

केंद्रातील भाजपच्या सरकारचे धोरण, तरुणांना अनुकूल आणि विरोधकांना शह देण्यासाठीची रणनिती सुजयदादाकडे आहे. जनतेने आता डॉ सुजय दादा यांच्या कडे केंद्रीय मंत्रीपद भुषवावे अशीच इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे, महाराष्ट्रातील शेकडो आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना दत्तक घेणारे पहिले कुटुंब ठरले आहे, प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दरोरज हजारो गोरगरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार मिळतात,गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळातील योगदान लाख मोलाचे आहे, दिवसागणिक हजारो रुग्ण मोफत उपचार घेऊन बरे झाले आहे, विद्यार्थ्यांना प्रवरा शिक्षण संस्थेत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त शैक्षणिक शुल्क माफ केले आहे, जेष्ठ नागरिकांना केंद्र सरकारची सहाय्यक साधने पुरवणारी सर्वात मोठी योजना संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात आली,

 

विखे-पाटील कुटुंबाने समाजकारणात व राजकारणात तीन पिढ्या विखे पॅटर्न राबविला आणि तो सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने दिलासादायक व लाभदायक ठरला म्हणून लोक लोकप्रियतेने विखे पाटील पॅटर्न बोलीभाषेत सर्रासपणे बोलतात. या पॅटर्नची लोकप्रियता वाढतच आहे त्यात २०१९ ला डॉ सुजय दादा यांच्या खासदारकी मुळे पॅटर्न अध्यायात होऊन “सुजय पर्व” उदयास आले आहे असे म्हटले जाते.

 

पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील, पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हा परिषद मा. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ सुजय दादा, धनश्रीताई असा चौथ्या पीढीचा सामाजिक बांधिलकी जपत प्रवास सुरू असतानाच सुजयदादांची चिमुकली मुलगी सुद्धा भविष्यात पाचव्या पिढीचे नेतृत्व करेल अशी चुणूक दाखवून दिली ती थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-मेल करुन भेटण्याची इच्छा व्यक्त करत वेळ मागितली आणि हा बालहट्ट विखे-पाटील कुटुंबाला पुर्ण करावा लागला.स्वता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या यातच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *