संगमनेर । झुंजार न्यूज

 

शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहमदनगर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी रिमझिम पाऊस व अत्यंत भक्तीमय वातावरणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी या पालखीचे स्वागत व पूजन केले.

 

पारेगाव बु.येथे पंढरपूर साठी निघालेल्या या पालखीचे सुमारे 20 हजार वारकऱ्यांसमवेत आगमन झाले. यावेळी माजी आ.डॉ.तांबे यांनी पालखीचे पूजन केले याप्रसंगी समवेत अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर,उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक देविदास ढूमने,डॉ दत्तात्रय गडाख, त्र्यंबकराव गडाख, साहेबराव गडाख, सोपानराव येलके, दौलत गडाख, ज्ञानेश्वर मुंगसे, आदींसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

 

रिमझिम पावसात सुमारे वीस हजार वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला. लेझीम पथक, पारंपारिक वाद्य व वेशभूषा करून गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी या पालखीचे स्वागत केले.

 

यावेळी बोलताना डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, संत निवृत्तीनाथ महाराज पालखीला मोठी परंपरा आहे दरवर्षी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात ही अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करताना या पालखीचे स्वागत करतात.महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे .वारकरी संप्रदाय हा हजारो वर्षांपूर्वीच असून सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. जात-पात धर्म हा कोणताही भेदभाव या संप्रदायात नाही.

 

विठ्ठलाची पायी वारी ही महाराष्ट्राची मोठी संस्कृती असून यामध्ये गोरगरीब लहान थोर सर्व सहभागी झालेले असतात. भेदभाव विसरून एकत्र येऊन आनंदाने तल्लीन होऊन पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक व धार्मिक परंपरा असून यावर्षीही राज्यात भरपूर पाऊस पडू दे शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना ही त्यांनी यावेळी केली.

 

विविध वारकऱ्यांनी फुगडी खेळत डोक्यावर तुळशी वृंदावन घेत सर्वांच्या  समवेत अभंग गायले हरिनामाचा गजर आणि भक्तीमय वातावरणाने सर्व परिसर दुमदुमून गेला होता

 

चौकट

आमदार थोरात कडून पालखीचे स्वागत

अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करताना दरवर्षी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित राहून पालखीचे स्वागत करतात. उद्या पावसाळी अधिवेशन असल्याने आमदार थोरात हे मुंबईत आहेत यावेळी त्यांनी दूरध्वनी वरून वारकरी व गावकरी यांच्याशी संवाद साधला. तसेच मनोभावे या पालखीचे दर्शन घेतले

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed