आमदार बाळासाहेब थोरात यांची विधानसभेत आग्रही मागणी



संगमनेर । झुंजार न्यूज

सध्या अनेक परीक्षांमध्ये पेपर फुटी सारख्या गंभीर घटना घडत असून त्या अत्यंत गंभीर व दखलपात्र आहे. त्यामुळे पेपर फुटी विरोधात दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली आहे.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडताना आमदार थोरात म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात तलाठी भरती प्रक्रिया झाली. मात्र या परीक्षेत आहे त्या मार्कांपेक्षा काही विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स मिळाले. ही घटना अत्यंत गंभीर असून यात अनेक जण सहभागी आहे. त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.

अनेक तरुण खूप कष्ट करून सातत्याने अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. मात्र काही जणांना अशा प्रकारची जास्तीचे मार्क मिळतात हा त्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय आहे. नीट परीक्षेसारख्या महत्त्वाच्या परीक्षेतही अशा बाबी घडल्या. देश पातळीवर ही घटना अत्यंत गंभीर आहे व विचार करायला लावणारी आहे.

सरकारमध्ये आता अनेक विभागांमध्ये लाखो रिक्त जागा असून याबाबत कोणतीही भरती होत नाही. व भरती झाली तरी त्यात मोठ्या प्रमाणावर घोटाळे होतात त्यावर सरकारने ठोस पावले उचलली पाहिजे व हे घोटाळे थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न केले पाहिजे. असेही यावेळी आमदार थोरात म्हणाले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *