थोरात महाविद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
संगमनेर । झुंजार न्यूज
भारतीय सीमेवर लष्करातील जवान डोळ्यात तेल घालून मातृभूमिचे रक्षण करत असतो. त्यामुळेच देशातील प्रत्येक नागरिकांचे जीवन व कार्य सुरक्षित व सुरळीतपणे चालू असते. लष्करातील प्रत्येक जवान आपले कुटुंब सोडून मायभूमिच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असतो. सन १९६५, १९७१ व १९९९ च्या युद्धात भारतीय सैनिकांनी आपल्या कर्तृत्वाने व जिद्दीने ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. विजयासाठी रक्तामध्येच राष्ट्रभक्ति, शूरता, निढरता आदी गुणांची आवश्यकता असते असे प्रतिपादन लेफ्टनंट अनिल पावसे यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, उपप्राचार्य डॉ. विलास कोल्हे, नक्की समन्वयक डॉ. लक्ष्मण घायवट आदी उपस्थित होते.
लेफ्टनंट पावसे म्हणाले, आजचा दिवस हा भारतीय लष्करातील शूर जवानाच्या शौर्याला, पराक्रमाला आणि बलिदानाला सलाम करण्याच दिवस आहे. १६००० फूट उंचीवरील कारगिल टेकडीवरून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मेजर विक्रम बत्रा व त्याच्या टीमने धोक्याने कब्जा केलेल्या पाकिस्तानी सैन्याला लोटपोट करून भारतीय भूमीची पारतंत्र्यातून सुटका करून पुन्हा त्या भूमीवर २६ जुलै १९९९ रोजी तिरंगा फडकविण्यात आला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये सैनिकाप्रमाणे जिद्द, चिकाटी, समर्पण, आत्मविश्वास यासारखे गुण विकसित होण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. यानिमित्त त्यांनी सर्वाना कारगिल विजय दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी एन.सी.सी. प्रमुख लेफ्टनंट डॉ. राजेंद्र जोरवर, डॉ. शोभा राहाणे, प्रा. नानासाहेब दिघे, प्रा. नवनाथ नागरे, प्रा.मिनेश सातपुते, प्रा. मंगेश जोर्वेकर, प्रा. पल्लवी गडाख, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.एन.सी.सी. गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




