११ विद्यार्थी पात्र, तर साईशा झावरेची नवोदयसाठी निवड
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संचलित, वीरभद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात आपली उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात विद्यालयाचे तब्बल ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून, कु. साईशा संतोषकुमार झावरे हिने जवाहर नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
विद्यालयाची विद्यार्थिनी कु. साईशा संतोषकुमार झावरे हिने या परीक्षेत ३०० पैकी २६८ गुण मिळवून ८९.३३ टक्केवारीसह विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या घवघवीत यशाची दखल घेत, तिची टाकळी ढोकेश्वर येथील प्रतिष्ठित ‘जवाहर नवोदय विद्यालया’त प्रवेशासाठी निवड झाली आहे. एकाच वेळी शिष्यवृत्ती आणि नवोदय अशा दोन्ही परीक्षांत यश मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यालयातील इतर १० विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत शिष्यवृत्ती पटकावली आहे. यामध्ये प्रामुख्याने सुफियान शाहिद चौगुले: १८० गुण (६०%), आसिया जावेद शेख: १६४ गुण (५४.६६%) , खुशनुमा शाकीर पटेल: १६४ गुण (५४.६६%) , श्रद्धा गणेश लोंढे: १६४ गुण (५४.६६%) , नुजत असीफ इनामदार: १५४ गुण (५१.३३%) , सायमा नुरशहा चौगुले: १५२ गुण (५०.६६%) , मोहम्मद कौशिफ अन्सार मोमीन: १५० गुण (५०%) , समर्पण राजेंद्र खेमनर: १४० गुण (४६.६६%) , राणी संजय ढेंबरे: १३० गुण (४३.३३%) क्षितिज प्रमोद साळुंके: १२६ गुण (४२%) या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाने विद्यालयाच्या नावलौकिकात मोलाची भर घातली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शालेय प्रशासनाचे सुयोग्य नियोजन आणि शिक्षकांचे कठोर परिश्रम कारणीभूत आहेत. विद्यालयाचे प्राचार्य एस. के. खेमनर व पर्यवेक्षक डी. एम. पवार यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शक शिक्षक राजेंद्र कांबळे, समरीन शेख, गंभीरे, खेमनर व ढोणे यांनी घेतलेल्या जादा तासांमुळे विद्यार्थ्यांना हे यश संपादन करता आले. पालकांनीही आपल्या पाल्यांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देऊन शिक्षकांना सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे पदाधिकारी, साकूर ग्रामस्थ, शिक्षकवृंद आणि पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.