शिर्डी l झुंजार न्यूज
राज्यातील महायुतीचे सरकार लोकाभिमुख काम करत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त भ्रष्टाचार सुरू होता. जिल्ह्याला तीन मंत्री होते पण जनतेसाठी कोणाचाही उपयोग नाही. एकही योजना जिल्ह्याला आणता आली नाही. आज बोलघेवडे पुढारी येऊन करीत असलेल्या टिकेला मी घाबरत नाही. त्यांचे योगदान तरी काय? तुमच्या आशीर्वादाने या मतदारसंघाचा विकास पुढे नेण्याकरीता कटीबध्द राहण्याची ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली.
महसूल पंधरवडा निमित्त राहाता येथे विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभांचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी शिर्डी प्रांताधिकारी माणिकराव आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, राहाता तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब जेजुरकर, मुकुंदराव सदाफळ आदी उपस्थित होते.
सर्व धरण भरली आहेत कालव्यात पाणी सोडले आहे. यामधून तळे भरून देण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यापूर्वी सामान्यांना पाणी वाटप कायद्याचा मोठा त्रास झाला. कायदा करण्यास कारणीभूत ठरलले यावर बोलायला तयार नाहीत. यासाठी मोठा संघर्षही झाला न्यायालयीन लढाई केली. आज गावागावात येऊन बोलणारे तेव्हा कुठे होते? शेती महामंडळाच्या जमीनी मोफत देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. औद्योगिक वसाहत होत असल्याने डिफेन्स क्लस्टरचा मोठा प्रकल्प येत असून तालुक्यातील दोन हजार युवकांना रोजगार निर्माण होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
तालुक्यातील या मेळाव्यात सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनेत ८१३ लाभार्थ्यांना आणि कृषी विभागाच्या १२०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. तालुक्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ७६ कोटी ३३ लाखांचा आरोग्य लाभ वितरित करण्यात आला. १७ हजार २६३ शेतकऱ्यांच्या खात्यात ९ कोटी ४४ लाखांचे दूध अनुदान देण्यात आले. ४४ हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला. निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे असे ही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशन आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या कामास जिल्ह्यात सुरूवात आली. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज या मेळाव्यात भरण्यात आले. या योजनेची गटविकास अधिकारी श्री.पठारे यांनी माहिती दिली.
याप्रसंगी सामाजिक अर्थसहाय्यातील संजय गांधी निराधार अनुदान, इंदिरा गांधी, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन, आदिवासी शासकीय प्रमाणपत्र व शिधापत्रिकेचा प्रत्येकी पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे महसूलमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कृषी विभागाच्या ११ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी पोलीस विभागात शासन नियुक्ती मिळालेले स्थानिक युवतींचा व सीए परीक्षा पास झालेल्या युवकाचा महसूलमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

