संगमनेर l झुंजार न्यूज
राज्य शासनाच्या निर्देशानुसार १ ऑगस्टपासून खरीप हंगाम – २०२४ करिता शेतकरी स्तरावरून मोबाईलद्वारे ई-पीकपाहणीची नोंद सुरू करण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद करावी, असे आवाहन तहसीलदार धीरज मांजरे यांनी केले आहे.

संगमनेर तालुक्यात एकूण १७४ गावे असून, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार १ ऑगस्टपासून खरीप हंगाम २०२४ करिता शेतकरी स्तरावरून मोबाईलद्वारे ई-पीक पाहणी नोंद सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मोबाईलवर ई-पीक पाहणी व्हर्जन म्हणून ३.०.२ अद्यावत करून घ्यावे व आपल्या शेतातील पिकांची नोंद लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी. शासनाकडून पीकविमा योजना, नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान जाहीर केल्यास ते वाटप करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी पीक पेराची नोंद ई-पीक पाहणी पद्वारे न केल्यास शासनाकडील अनुदान बाधित शेतकऱ्यांना मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते. यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे, की सर्व शेतकरी बंधूंनी आपापल्या शेतातील पीक पेराची नोंद तात्काळ ही ई-पीक पाहणी अँपवरून करून घ्यावी.

या कामात काही अडचणी उद्भवल्यास संबंधित गावचे तलाठी, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी (महसूल), तालुका कृषी अधिकारी व तहसील कार्यालय, संगमनेर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
