अहिल्यानगर l झुंजार न्यूज
‘विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने महायुतीकडे आठ जागा देण्याची मागणी केली होती. मात्र, मित्रपक्षांना डावलून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:च्या जागा वाढविल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांत असंतोष असून ‘रिपाइं’ने महायुतीच्या प्रचारावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून जो पदाधिकारी महायुतीच्या सभेत दिसेल त्याच्यावर कारवाई होईल तेव्हा नेते रामदास आठवले यांचे आदेश येईपर्यंत बहिष्कार कायम राहील,’ अशी माहिती पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी दिली .

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची संगमनेर , श्रीरामपूर , कोपरगांव , शिर्डी , राहाता , राहुरी सह दक्षिणेत अनेक ठिकाणी बैठका झाल्या. झालेल्या बैठकीतून श्रीरामपूर विधानसभेची जागा पाहिजेल अशा प्रत्येक कार्यकर्त्यानी बोलून दाखविले . मात्र या बाबत कुठलाही विचार होताना दिसत नाही महायुतीत घटकपक्ष असल्यामुळे ‘रिपाइं’ला श्रीरामपूरसह आठ जागा देण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह जिल्हयातील कार्यकर्त्यांनी केली आहे .

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी प्रत्येकी तीन जागा सोडल्या पाहिजेत, असे आठवले यांनी म्हटले होते. मात्र, महायुतीच्या जागा जाहीर झाल्या असून ‘रिपाइं’ला अद्याप एकही जागा सोडलेली नाही. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीतून महायुतीचा निषेध करण्यात आला आहे . ‘शिंदे, फडणवीस आणि पवार यांनी स्वत:च्या जागा वाढवून घेतल्या आहेत. मित्रपक्षाला जागा देण्याची भूमिका घेतली नाही. सत्तेत बसण्यासाठी यांना दलितांची मते हवी आहेत. राज्यात ‘रिपाइं’ची अवहेलना सुरू आहे. कार्यकर्त्यांत असंतोष असून महायुतीचे काम करणार नसल्याचा ठराव घेतला आहे,’ असे एका नेत्यांनी सांगितले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात ‘रिपाइं’च्या कार्यकर्त्यांना सन्मानावे वागवले जात नाही. विचारात घेतले जात नाही. त्यामुळे महायुतीच्या प्रचारावर बहिष्कार टाकत असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. तसेच कुणी पदाधिकारी प्रचारात आढळल्यास पक्षांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही एका वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे.

