शिर्डी l झुंजार न्यूज
अहिल्यानगर जिल्ह्यातील रामराव आदिक यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले, त्या वेळी सगळ्या जिल्ह्याने आनंद व्यक्त केला होता. एका विमानप्रवासाचे निमित्त होऊन त्यांना त्या पदावरून पायउतार व्हावे लागले आणि तेव्हापासून जिल्ह्यातील नेते महसूल मंत्रिपदाच्या पुढे गेलेच नाहीत. यंदा तशीच संधी आली आहे. किंबहुना अगदी मुख्यमंत्री पदाची खुचीं मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून जिल्ह्याला खुणावत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्याने पाहिलेले हे स्वप्न राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रूपाने पूर्ण व्हावे, हीच साऱ्या जिल्ह्याची इच्छा असायला हरकत नाही.
जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल काही अंशी अनपेक्षितच लागल्याचे मानले जाते. ‘असे कसे झाले, याची चर्चा प्रत्येकाच्या हातातील सहा इंची स्क्रीनच्या कट्ट्यावर पुढील काही दिवस रंगेलही. पण त्यामुळे आता काळ थांबणार नाही. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे आणि सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपचा मुख्यमंत्री निवडला जाईल हेही नक्की. पण मुख्यमंत्री कोण, या प्रश्नावर जेव्हा चर्चा सुरू होईल, तेव्हा अहिल्यानगर जिल्ह्यात तरी राधाकृष्ण विखे पाटील हे नाव पुढे आल्याशिवाय राहत नाही.
सलग आठव्यांदा आमदार म्हणून विजयी होणे आणि महसूलसह विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद वारंवार सांभाळणे या विखे पाटील यांच्या सिनिऔरटीबाबत कुणाच्या मनात शंका येण्याचे कारण नाही. महायुतीची ताकद म्हणून पाहिले, तरी अहिल्यानगर जिल्ह्यात १२- ० विजयाची खात्री विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याच नगर शहरात दिली होती आणि ती प्रतीज्ञा त्यांनी १०-० अशी पूर्णही केली. कर्जत-जामखेडमध्ये अगदीच ‘काटे की टक्कर’ झाली आणि श्रीरामपुरात मतविभाजनामुळे विजय दूर गेला म्हणून; अन्यथा जिल्ह्यात १२-०ची फिगर गाठलीच होते. विखे पाटील यांचे महायुतीमधील हे योगदान पाहिले तरी त्यांचे पारडे सध्या जड दिसत आहे. कारण एक तर जिल्ह्यातून महायुतीला १०-० चे पाठबळ दिले आणि दुसरे म्हणजे सलग आठ वेळा आमदार, मंत्री असलेले आणि काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असणारे बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. थोरात हे विखेंचे पारंपरिक विरोधक अगदी १९८५ पासून. एकाच पक्षात असतानाही हा विरोध कधी शमला नाही, की कमीही झाला नाही. त्यामुळे थोरातांचा पराभव विखेंचे मोठेच यश आहे. शिवाय राज्यातील महत्त्वाचे आणि काँग्रेसच्या केंद्रीय वर्तुळातील नेते म्हणूनचं थोरातांच्या पराभवाला विरोधकांच्या दृष्टीने महत्त्व आहे. भाजपची सत्ता असताना कडवा विरोध करण्याची क्षमता केवळ थोरात यांच्यामध्येच होती. त्यादृष्टीनेही त्यांना विधानसभेपासून दूर ठेवण्यात आलेल्या यशाचे संपूर्ण श्रेय विखे पाटलांचे आहे, हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. खरे तर निवडणूक आणि प्रचाराच्या रणधुमाळीत पक्ष कोणताही असो, ‘सबकुछ विखे’ असेच चित्र असते, त्याचे प्रत्यंतर यंदाही आले. नेवासा मतदारसंघात भाजपामधून शिवसनेत आणून विठ्ठलराव लंघे यांना शंकरराव गडाख नांच्यासमोर उभे करण्याची रणनीतीही विखे पाटलांचीच होती. तीही यशस्वी झाली आणि मंत्री राहिलेल्या गडाखांना पराभवाची चव चाखावी लागली. लंघे यांच्या या विजयातही विखे यांचे मोलाचे योगदान आहे. कोपरगावात बंडखोरी करून रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांना तलवार म्यान करण्यास भाग पाडण्यातही विखे यांचीच मुत्सद्देगिरी महत्त्वाची ठरली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच तर कोल्हे मायलेकांशी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चर्चा घडून आली, असे मानले जाते. खरे तर कोल्हे यांच्या माघारीमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचाच मार्ग कोपरगावात सुकर झाला. म्हणजे फक्त भाजपच्या उमेदवारांसाठी नव्हे, तर महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांसाठीही विखे पाटलांचे योगदान मोलाचे ठरले. या अंगानेही विखे पाटलांचे पारडे महायुतीमध्ये जड मानले, तर वावगे ठरणार नाही.
अडीच वर्षांपूर्वी सत्तांतर होताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रिपद नाकारून एकनाथ शिंदे यांच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवली. ही भूमिका त्यांनी ज्या विचारांतून घेतली, त्याच विचारांच्या आधारे ते विखे पाटील यांच्या मागे उभे राहतील, अशी आशा विखे समर्थकांना आहे. किंबहुना धार्मिक ध्रुवीकरणाच्या आरोप-प्रत्यारोपांच्या काळात मराठा समाजाचा अनुभवी चेहरा म्हणूनही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विखे पाटील यांच्याकडे पाहिल्यास नवल वाटायला नको. मराठा आरक्षणाचे आंदोलन भविष्यात पुन्हा उभे राहणारच नाही, याची खात्री नाही आणि मराठा समाजाचा फडणवीस यांच्यावर असलेला रोष पाहता हे प्रकरण हाताळण्याची क्षमता असलेला नेता म्हणूनही विखे पाटील यांच्याकडे पाहायला हरकत नाही. विविध खात्यांच्या मंत्रिपदाच्या निमित्ताने उत्तम प्रशासक म्हणूनही विखे यांचा प्रशासनात दबदबा आहे.
एकूणच मुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या सर्वच कसोट्या विखे पाटील पूर्ण करतात. म्हणूनच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील ‘ते’ खास दालन त्यांना खुणावत आहे. नव्हे, आमंत्रणचं देत आहे. हे स्वप्न पूर्ण झाले, तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरावर शोभून दिसणारा हा सुवर्ण मुकूट असेल, हे नक्की !

