संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

 

 

स्व इतिहासात महाराष्ट्राचे मोठे स्थान आहे. महाराष्ट्र हा जसा डोंगर, दऱ्या खोल्या, समुद्रकिनारा अशा विविधतेने नटला आहे. तसाच तो मोठ्या कर्तबगार व्यक्तींची जन्मभमी व कर्मभमीही राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत, महाराजे, कवी, लेखक, साहित्यिक ते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वापर्यंत सर्वांनी स्वतःच्या कार्यातून छाप सोडली आहे. या सर्वांच्या विचारांचा पगडा असणारे स्व. भाऊसाहेब संतुजी थोरात ऊर्फ दादा यांच्या व्यक्तीमत्वाची जडण घडण स्व. डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या बरोबरीने स्वातंत्र्य चळवळीच्या मुशीत झाली. स्वातंत्र्य आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणारे दादा यांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सहकाराचा मार्ग निवडला. सहकारातून गोरगरिबांचे जिवनमान उंचविण्यासाठी रचनात्मक कार्यातून त्यांनी सहकाराला एक नवी दिशा दिली. प्रगतीचा राजमार्ग असलेल्या सहकारात पारदर्शकता, आर्थिक शिस्त, काटकसर, आधुनिकता व समाजोपयोगिता ही नवे तत्वे राबवित त्यांनी एक नवा मंत्र दिला. यशस्वितेसाठी प्रत्येकाच्या जिवनात मार्गदर्शकाची भूमिका महत्वाची असते, तिच भूमिका माझ्या जिवनासह संगमनेर तालुक्याच्या सर्वांगिण विकासात दादांची राहिली. दादांनी सहकार स्वतः च्या कुटुंबाच्या पलिकडे जपला, तो वाढविला आणि कार्यकत्यांची मोठी फळी निर्माण केली.

 

 

 

 

 

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी संगमनेरमध्ये वकिलीची प्रॅक्टीस करु लागलो. त्यावेळी दादांचे सहकार व समाजकार्य सुरु होते. या काळात विडी कामगारांच्या आंदोलनात मी सहभाग घेतला. औरंगाबाद विद्यापीठ नामांतर, कामगार, विडी आंदोलनातील सहभाग यामुळे माझा समाजकार्याला प्रारंभ झाला. पुढे दादांनी शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून सुरु केलेल्या दुग्ध व्यवसायाचा १९८२ सालापासून आम्ही तरुण मुले प्रचार प्रसार करु लागलो. गावोगावी बैठका, मेळावे घेवून, तालुक्यात दूध संस्था सुरु केल्या.

 

 

 

१९८५ च्या विधानसभा निवडणूक माझ्या जीवनात मैलाचा दगड ठरली. जनतेच्या आग्रहास्तव मला अपक्ष म्हणून कार्यकत्यांनी निवडणूकीत उतरविले. काँग्रेस पक्षाच्या विरोधात जाणे दादांना कधीच मान्य नव्हते. त्यांनी साधा कधी माझ्या प्रचारात सहभागही घेतला नाही. ते आपल्या तत्वाशी कायम एकनिष्ठ राहिले. १९८५ सालची निवडणूक जिंकल्यानंतर समाजकारणाचे काम करताना दादांची कार्यपद्धती हीच आपल्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे ठरली. साधी राहणी, पारदर्शक कारभार, सतत लोकांची कामे करणे, हा मंत्र मी जपला.

 

 

पुढे दिवसेंदिवस कार्यकर्त्यांचा संग्रह बाढत गेला, संगमनेर तालुक्यातील वाड्या वस्त्या, नदी, नाले, रस्ते, डोंगर व दऱ्यांची भौगोलिक माहिती मला मिळाली. विकासकामांच्या विविध योजना मार्गी लावताना याचा मला मोठा उपयोग झाला, तालुक्यासह तळेगाव भागासाठी असलेले निळवंडे धरण पूर्ण होणे हे दादांचे स्वप्न होते. यासाठी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या सहकायनि हे काम मार्गी लावण्यास मी प्राधान्य दिले. दादांची तालुक्याच्या विकासाबाबत सहकारावर करडी नजर होती. ते नेहमी म्हणत की, ‘सहकार संस्था मुलांप्रमाणे सांभाळा. या संस्थांमध्ये विश्वस्त म्हणून काम करताना आपल्याला देता येईल, ते योगदान द्या. यातून संस्था वाढतील. त्यांचा जनसामान्यांना फायदा होईल!’

 

 

 

दादांची स्मरणशक्ती अफाट होती. कार्यकर्त्यांना ते अगदी नावानिशी हाक मारुन, कार्याची प्रेरणा द्यायचे, आळस, अंधश्रद्धा, नकारात्मक दृष्टीकोन या सर्वांचा त्यांना राग होता. विज्ञानवादी वारकरी असलेले दादा हे साहित्याचे मोठे चाहते होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांना कार्यक्षेत्रावर बोलावून, ते त्यांचे मार्गदर्शन सर्वांसाठी घडवून आणत. यामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख, य. दी, फडके, राम कदम, ना. धो. महानोर, डॉ. विठ्ठल वाघ, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, माजी पंतप्रधान चंद्रशेखर या दिगजांचा समावेश राहिला.

 

 

 

 

 

दादांना कधीही खोटे आवडले नाही. स्पष्टोक्तेपणा हे त्यांचे मोठे गुणवैशिष्ट्य राहिले. कधीही चुकीच्या गोष्टींना त्यांनी पाठीशी घातले नाही. यामुळे आमच्यासारख्या सर्व कार्यकत्यांना एक मोठी शिस्त लागली. वैचारिक अधिष्ठान लाभले, चांगली कामे करताना या सकारात्मक विचारांचे मोठे पाठबळ मिळाले . तालुक्याच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर दादांचे मार्गदर्शन महत्वाचे राहिले. १९९९ सालामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या विभाजनावेळी दादांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात राहण्याचा दूरदृष्टी निर्णय घेतला. त्यांची काँग्रेसच्या विचारांवर निष्ठा होती. १९९९ मध्ये स्व. विलासराव देशमुख यांच्या मंत्री मंडळात मी आवडीचे पाटबंधारे खाते मागावून घेतले, निळवंडे धरणाच्या कामाला प्रारंभ केला. ‘आधी पुनर्रवसन, मग चरण, हा अनोखा पॅर्टन राबविताना आमची जार्वे येथील ५ एकर जमीन दिली. या कामातील अडथळे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या सहकार्यातून दूर केले. अनेक अडथळ्यांवर मात करीत अखेर निळवंडे धरण पूर्ण केले. या कामाची पाहणी करण्यासाठी दादा वेळोवेळी निळवंडे धरणाला भेट देत राहिले. आदिवासी पुनर्रवसीतांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत राहिले,

 

 

 

 

२००४ सालामध्ये कृषी मंत्रीपद सांभाळताना शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचवा, हा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. मी रात्रभर फिरुन दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करीत होतो. त्या काळात शेतीत विविध नविन योजना राबविल्या गेल्या. १ लाख शेततळ्यांची निर्मिती, महापीक

 

 

 

अभियानातून २००६ मध्ये राज्यात आत्तापर्यंतचे सर्वाधिक कृषी उत्पन्न झाले. मंत्री मंडळात विविध खाती सांभाळताना दादांची काम करण्याची शैली मोठी मार्गदर्शक ठरली. दिवसाची सुरुवात सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सतत दौरे, बैठका, कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी, जनतेची कामे मार्गी लावणे यासर्व गोष्टींना प्राधान्य दिले. कधीही विश्रांती घेतली नाही.

 

 

 

 

संगमनेर तालुक्यातही विकासाच्या अनेक योजना राबविल्या जात होत्या. सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, त्या पारदर्शक व आदर्शवत चालविणे हे कार्यकत्यांचे काम आम्ही चोखपणे पार पाडत होतो. २००६ सालामध्ये दादांनी पर्यावरण संवर्धनासाठी वयाच्या ८४ व्या वर्षी दंडकारण्य अभियान राबविले. तालुक्यातील सर्व जनतेसह विद्यार्थ्यांच्या सहभागाने हे अभियान आता मोठी लोक चळवळ झाले आहे. दरवर्षी कोटी वियांचे रोपण करुन वृक्षसंवर्धनासह वृक्षसंगोपणाची संस्कृती तालुक्यात वाढली. या अभियानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली.

 

 

 

 

 

देशासह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या अभियान आंदोलनाचे कौतुक केले आहे. दादांनी अगदी शेवटच्या चासापर्यंत तालुक्याचा विकास व्हावा, हा ध्यास जपताना कार्यकर्त्यांना सदैव पाठबळ दिले. अगदी आजारपणातही प्रत्येक कार्यकर्त्याची त्यांनी काळजी घेतली. हहनिशयी व स्पष्टोक्ते दादांच्या जीवन कार्यावर अमेय प्रकाशनने दादांनी लिहिलेले अमृतगाथा व अमृतमंथन ही जिवनचरित्रे नव्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत ठरली.

 

 

 

 

 

निकोप- सुसंस्कृत राजकारणाची परंपरा

 

१४ मार्च २०१० रोजी तिर्थरुप दादांच्या जाण्याने माझ्यासह तालुक्याच्या जिवनात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या जाण्याने एक दीपस्तंभ हरपला, मात्र त्यांचे विचार सदैव पाठीशी ठेवून, आम्ही सतत कार्यरत राहिलो. निकोप व सुसंस्कृत राजकारणाची मोठी परंपरा निर्माण करुन, संगमनेर तालुका विकासाचे मॉडल ठरला. यासाठी मंत्रीपदाच्या काळात मी प्रत्येक खात्याला न्याय दिला. महसूलला तर अगदी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने गौरविण्यात आले. निळवंडे धरणासह कालव्यांची कामे पूर्ण करुन, येथील दुष्काळी भागाला निळवंडेचे पाणी दिले. गोर गरिबांसह सर्वसामान्यांच्या जिवनात सदैव आनंद निर्माण केल्याचे समाधान वाटत आहे. यासर्व वाटचालीत तीर्थरुप दादांचे विचार, तत्व आणि जिवनकार्य सदैव दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी ठरत आहे.

 

 

 

बाळासाहेब थोरात, माजी मंत्री

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *