
अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने टँकरच्या मागणीत झपाट्याने घट

संगमनेर l झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यात मे महिन्यात दमदार अवकाळी पाऊस झाला. आता जून महिन्यातही अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे टँकरची मागणी कमी होत असून सध्या १६ गावे ४९ वाड्यांना १४ टँकरने पाणीपुरवठ केला जात आहे.

यंदा अवकाळी पावसाने तालुक्यात थैमान घातले होते. अनेक भागात दमदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मानसून पूर्व पावसाने तालुक्यात चांगली हजेरी लावल्याने जून महिन्यातही चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. जून महिन्यातही पावसाला सुरुवात झाली असून तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक भागात पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत झाली. पावसापूर्वी तालुक्यात २६ गावे ६३ गाड्यांना २१ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र पावसाने हजेरी लावल्याने हळूहळू टँकर कमी होत असून यंदा टॅंकर कमी होण्याची गती अधिक आहे .

सध्या तालुक्यात १६ गावे व या गावा अंतर्गत येणाऱ्या विविध ४९ वाड्यांना १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. संगमनेर तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामपंचायत टँकरचे प्रस्ताव दाखल करत असते. फेब्रुवारी मार्च मध्ये सुरू होणारे टँकर पावसाने ताण दिल्यास जुलै अखेरपर्यंत चालतात. यंदा मात्र अवकाळी पावसाने टँकरची संख्या नियंत्रणात राहण्यास मोलाचे मदत झाली. यंदा प्रथमच मे महिन्यातच टँकरची मागणी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जून मध्ये टँकरची संख्या कमी होत असून या महिन्यात पाऊस चांगला झाल्यास टँकर आणखी कमी होवून हळूहळू ते बंद होतील. विविध गावांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटावी यासाठी शासनाने पंचायत समिती ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध गावात जलजीवन योजना राबवली. मात्र अनेक गावात ही योजना कागदावरच असून अपूर्ण योजनांमुळे पिण्यासाठी पाणी उपलब्ध झालेच नाही. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. सध्या ही योजना नागरिकांसाठी कमी व सरपंच उपसरपंच पदाधिकारी आणि ठेकेदारांसाठी फायदेशीर ठरत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक जलजीवनच्या योजना संगमनेर तालुक्यात राबविण्यात आल्या. मात्र मुदत संपूनही या योजनेची कामे अपूर्णच आहे. तर अनेक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याने याबाबत आता आमदार अमोल खताळ यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
