स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वारे वाहू लागताच संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अचानकपणे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील निमगांव जाळी, आश्वी बुद्रुक आणि उंबरी बाळापूर या तीन गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतल्याने, या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आश्वी खुर्द येथील विखे पाटील महाविद्यालयात पार पडलेल्या या बैठकीमुळे आगामी निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
येत्या काही काळात स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने, राजकीय पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर, ना. विखे पाटील यांनी वेळेचे महत्त्व ओळखून या तीन गावांमधील प्रमुख कार्यकर्त्यांना आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांच्या अडीअडचणी आणि गावातील विविध प्रश्न, समस्या यावर थेट संवाद साधला. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीस पंचायत समितीचे माजी सदस्य सरुनाथ उंबरकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, मच्छिंद्र थेटे, सौ. कांचन मांढरे, सौ. रोहिणी निघुते, सीताराम चांडे, रामभाऊ भूसाळ, मोहीत गायकवाड , विखे पाटील कारखाना संचालक विजय म्हसे, अनिल म्हसे, अशोक जऱ्हाड, वैभव ताजणे, अशोक तळेकर, नानासाहेब कदम, योगेश मुन्तोडे , सागर भडकवाड , शरद भडकवाड यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्यासोबत बांधकाम विभागाचे काशिनाथ गुंजाळ, राहुल गुंजाळ, प्रदीप सवत्सरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारीही या बैठकीत सहभागी झाले होते.
या बैठकीत प्रामुख्याने गावातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या समस्या यावर चर्चा झाल्याचे समजते. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे अनेक विषयांवर जागीच तोडगा काढण्याचा प्रयत्न झाल्याचेही दिसून आले. मंत्र्यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे समजते. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना आणि कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी भाजपतर्फे ही एक मोठी राजकीय खेळी मानली जात आहे. या बैठकीमुळे स्थानिक राजकारणात निश्चितच हालचाली वाढल्या असून, निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छिणारे कार्यकर्ते आता अधिक जोमाने तयारीला लागतील, असे चित्र दिसत आहे.