आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे शासनाधिकृत वाळू डेपोतून घरकुल योजनेच्या नावाखाली बेकायदेशीर वाळू वाहतूक होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय मुन्तोंडे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच आहे. प्रशासनाकडून उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली असली तरी, मुन्तोंडे आपल्या पाच मागण्यांवर ठाम असल्याने याप्रकरणी तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Oplus_131072
एका महिन्यापूर्वी शिबलापूर येथे शासनाने वाळू डेपो सुरू केला होता. मात्र, या डेपोतून एकाच पावतीवर अनेक डंपर वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची तक्रार संजय मुन्तोंडे यांनी केली आहे. या विरोधात त्यांनी गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रांतधिकाऱ्यांच्या सूचनेवरून सर्कल आणि तलाठी यांनी मुन्तोंडे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका मुन्तोंडे यांनी घेतली आहे.

 

Oplus_131072

 

उपोषणकर्त्यांच्या पाच प्रमुख मागण्या:
१. शिबलापूर येथील नदीपात्रातील वाळूचोरी रोखण्यासाठी २४ तास गस्त घालणारे पथक नेमावे.
२. शिबलापूर डेपोवरील वाळू प्रथम शिबलापूर येथील नोंदणीकृत लाभार्थ्यांना प्राधान्याने देण्यात यावी.
३. डेपोचालक आणि ठेकेदार यांची सखोल चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करावा.
४. चौकशी अहवालात डेपोचालक व ठेकेदार दोषी आढळल्यास वाळू डेपो कायमस्वरूपी बंद करावा.
५. गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

 

Oplus_131072
नायब तहसीलदार आणि सर्कल यांनी प्रांतधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरी, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. पाच दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने उपोषणकर्ते आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. या प्रकरणामुळे परिसरात वाळूचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसत असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पदाधिकाऱ्यांसह अधिकारीही यावर ठोस भूमिका घेत नसल्याने तणाव वाढत असल्याचे चित्र आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *