“सर्वांचे भले करा, कोणाचेही वाईट इच्छवू नका,” ही भारतीय संस्कृतीची अमूल्य शिकवण आहे, असे प्रतिपादन कीर्तनकार हभप किरण महाराज हराळे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे सुरू असलेल्या श्रावण महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताहात तिसऱ्या दिवशीच्या कीर्तनात ते बोलत होते.
हराळे महाराज म्हणाले की, भारताला चांगल्या कर्मांचा आणि नैतिक मूल्यांचा गौरवशाली इतिहास लाभला आहे. माणसांमध्ये देव पाहणे आणि नात्यांचा आदर करणे हे या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.
आपल्या कीर्तनात, हभप किरण महाराज हराळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, शिवाजी महाराजांनी केवळ एका राज्याची स्थापना केली नाही, तर ‘हिंदवी स्वराज्य’ या रयतेच्या कल्याणावर आणि न्यायावर आधारित संकल्पनेला जन्म दिला. शिस्तबद्ध लष्कर आणि सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या जोरावर त्यांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. प्राचीन हिंदू राजकीय परंपरा आणि न्यायव्यवस्थेचे त्यांनी पुनरुज्जीवन केले. त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे आणि दूरदृष्टीमुळे आज ते घराघरात पूजनीय आहेत. अलीकडे, लग्नसमारंभांसारख्या मंगल प्रसंगांची सुरुवात “जय देव जय देव जय शिवराया” या आरतीने करण्याची प्रथा वाढत आहे, जे त्यांच्याप्रती असलेल्या आदराचे प्रतीक आहे.
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांसारख्या अनेक संतांनी समाजाला दिशा दिली. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले. कीर्तन हे केवळ मनोरंजन किंवा भक्तीचे साधन नसून, ते लोकशिक्षणाचे एक प्रभावी माध्यम होते. जीवनाचा उद्धार करण्यासाठी संतांची संगत आणि नामास्मरण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले
आजच्या काळात कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे आणि मोबाईलच्या अतिवापराने तरुण पिढीवर दुष्परिणाम होत आहेत, यावरही महाराजांनी चिंता व्यक्त केली. या आव्हानांना तोंड देण्यासाठी मुलांना चांगले संस्कार देणे आणि जुन्या मूल्यांचे जतन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला महिला, तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाचे अन्नदाते म्हणून पाबळ, शिरतार, गपले, शिंदे यांनी योगदान दिले. पानोडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन सुंदर आणि अप्रतिम असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग कौतुकास्पद असल्याचे मत महाराजांनी व्यक्त केले.