संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात, ह.भ.प. ऋषिकेश महाराज थोरात यांनी आपल्या विनोदी आणि ग्रामीण भाषेतील कीर्तनशैलीतून उपस्थितांना सामाजिक आणि आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन केले.
या कीर्तनाला तरुण, महिला आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी होती. जाधव, चव्हाण, सोनवणे आणि पानसरे कुटुंबीयांतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या कीर्तनातून ऋषिकेश महाराज थोरात यांनी आजच्या समाजातील अनेक महत्त्वाच्या विषयांना हात घातला. त्यांनी धर्माची सद्यस्थिती आणि भरकटत चाललेली तरुण पिढी यावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, “धर्म बुडत चालला आहे, आणि आपण धर्मासाठी काय केले याचा विचार करण्याची वेळ आली आहे.” १५ वर्षांची मुले व्यसनाधीन होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आणि पालकांनी कष्टाने जपलेली प्रतिष्ठा धुळीस मिळत असल्याची जाणीव करून दिली.
ऋषिकेश महाराज थोरात यांनी आपल्या कीर्तनात आई-वडिलांच्या कष्टाचे आणि त्यांच्या आदराचे महत्त्व पटवून दिले. “मुलाच्या कष्टाची किंमत फक्त आईलाच कळते,” असे सांगून त्यांनी पत्नी आणि मुलांच्या प्रेमातील स्वार्थावर बोट ठेवले. परमेश्वराचे प्रेम निस्वार्थी असते, हे त्यांनी स्पष्ट केले. गोमातेला दुसरी आई संबोधून, तिच्या दुधाचे ऋण मानवावर असल्याचे ते म्हणाले. देव, आई आणि गोमाता या तिन्ही ‘माया’ असल्याचे त्यांनी सांगितले. “जगात कोणी कोणाचे नाही आणि कितीही मोठे झालात तरी सर्व काही देवाच्या हातात आहे,” हे विसरू नका, असा सल्ला त्यांनी दिला.
ऋषिकेश महाराज थोरात यांनी आजच्या मुली आणि महिलांनी अहिल्याबाई होळकर, जिजाऊ आणि प्रतिभा पाटील यांसारख्या कर्तृत्ववान महिलांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. या थोर स्त्रियांनी आपल्या चारित्र्याला कधीही डाग लागू दिला नाही, याची आठवण करून देत, आजकालच्या तरुण-तरुणींमुळे आई-वडिलांना पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “आपल्या आई-वडिलांची मान खाली जाईल असे वागू नका,” असा मार्मिक सल्ला त्यांनी दिला.
कीर्तनात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आणि विचारांचा संदर्भ देत, ऋषिकेश थोरात महाराजांनी सांगितले की, तुकोबारायांनी भौतिक संपत्तीचा त्याग करून आध्यात्मिक आणि परमार्थाचा मार्ग स्वीकारला. यातून त्यांनी समाजातील दोष, कौटुंबिक मूल्यांची घसरण आणि अध्यात्मापासून दूर जाणाऱ्या पिढीला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न आपल्या विनोदी आणि मार्मिक कीर्तनशैलीतून केला
कीर्तनाच्या शेवटी बजरंग दलाच्या वतीने भजनी मंडळींना भगवे शाली आणि टोप्या घालून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता हनुमान चालीसा पठणाने झाली.