शिर्डी । झुंजार न्यूज

शिर्डी येथील साईबाबा संस्थानमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून माजी सैनिक असल्याचे भासवून सुरक्षा विभागात अधिकारी पदावर काम करत कुशल कामगारांचा पगार लाटणाऱ्या २६ कर्मचाऱ्यांवर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. साई संस्थांनचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या बनावट माजी सैनिकांना अधिकारी पदावरून हटवून, अकुशल कामगार म्हणून शिपाई पदावर त्यांची गच्छंती केली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून साईबाबा संस्थानच्या सुरक्षा यंत्रणेत काही बोगस माजी सैनिक असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. या संशयाच्या आधारे संस्थानने बनावट माजी सैनिकांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. यासाठी संबंधित सिक्युरिटी एजन्सींना पत्र लिहून त्यांच्याकडे असलेल्या माजी सैनिकांची कागदपत्रे पडताळणीसाठी मागवण्यात आली होती.

जिल्हा कल्याण समितीचे अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल कोरडे यांच्या पथकाने संस्थानच्या कामगार कार्यालयात या माजी सैनिकांच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी केली. या पडताळणीत धक्कादायक बाब समोर आली. सुमारे २६ कर्मचारी बोगस माजी सैनिक असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे लष्करात काम केल्याची कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती.

कामगार अधिकाऱ्यांनी या पडताळणीचा अहवाल कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे पाठवला होता. मात्र, हा अहवाल सादर होऊनही तीन महिने उलटले तरी त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती. यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. रोहिणी पवार यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

सौ. रोहिणी पवार यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी संस्थानने या अहवालावर शिक्कामोर्तब करत कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सुरक्षा अधिकारी, बंदूकधारी आणि सुरक्षा निरीक्षक या पदांवर कुशल कामगारांचा पगार लाटणाऱ्या या बनावट माजी सैनिकांना १ सप्टेंबर २०२५ पासून शिपाई पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना यापुढे अकुशल कामगारांच्या श्रेणीतील पगार मिळणार आहे.

विजय साहेबराव गुडघे (सुरक्षा अधिकारी ते शिपाई, रा. सोनेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर), विजय नामदेव लाडवंशी, ज्ञानेश्वर धोंडीबा कांडेकर, साजन भानदास झिंजुर्डे, भाऊराव विष्णू झिंजुर्डे, विनोदाथ रामकृष्ण आहेर, दत्तात्रय भास्कर काळे, अशोक केशव तांबे, मारुती नाना कालेवार, सुनील अर्जुन गाढवे, सुजित एकनाथ थेटे, सुनील बाबासाहेब गंगावे, रवींद्र भास्कर घेगडमल, प्रभाकर बाळासाहेब खांदे, भाऊसाहेब निवृत्ती खैरनार, रामदास राधाकिसन गोर्डे, महेश रमेश सोनवणे, माधव निवृत्ती बनकवाड, शरद लक्ष्मण पगारे, विठ्ठल जगन्नाथ रक्ताटे, रावसाहेब गंगाधर सांगळे, भारत कोंडाजी कडभाने, अमोल अशोक गोसावी, ईश्वरलाल देवचंद असरवाल, शिवाजी सुभाष जाधव, साहेबराव नामदेव माळी.

या कारवाईनंतर अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्ष रोहिणी पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, साईबाबा संस्थानने या फसवणूक करणाऱ्या तोतया माजी सैनिकांचे निलंबन करून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे आणि त्यांनी घेतलेला कुशल कामगारांचा पगार वसूल करणे आवश्यक होते. त्यांना संस्थानच्या सेवेत ठेवून एक प्रकारे दया दाखवत त्यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत श्री. गाडीलकर यांची भेट घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे रोहिणी पवार यांनी सांगितले.

ही बातमी साईबाबा संस्थानच्या प्रतिमेला धक्का देणारी असून, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed