संगमनेर । झुंजार न्यूज 

 

 

गुरुवारी रात्री संगमनेर येथे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकशाहीने केलेला पराभव पचनी पडत नसल्यानेच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप करत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्लेखोरांना व त्यांच्या सूत्रधारांना तीव्र शब्दांत फटकारले. शुक्रवारी संगमनेर शहरातून निघालेल्या निषेध मोर्चात बोलताना विखे पाटील यांनी हा हल्ला अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले.

 

 

 

 

काल सायंकाळी गुंजाळ नावाच्या एका तरुणाने आमदार खताळ यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी ११ वाजता आमदार खताळ यांच्या कार्यालयापासून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. संगमनेर शहर आणि तालुक्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

 

 

पालकमंत्री विखे पाटील यांचे हल्लेखोरांना आव्हान

 

विखे पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, “गुरुवारी रात्रीचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करून जनतेला आपल्या जवळ ठेवण्याचे षडयंत्र आहे. लोकशाहीने केलेला पराभव पचनी पडत नसल्यानेच आमदार खताळ यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला.” मात्र, सर्वसामान्य नागरिक तेवढ्याच ताकदीने आमदार खताळ यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हल्लेखोर कोणाचा माणूस आहे हे सर्वांना माहीत असून, या हल्ल्यामुळे संगमनेरातील राजकीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला.

 

आमदार अमोल खताळ यांची निर्भीड भूमिका

या भ्याड हल्ल्याने आपण एक इंचही मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “आपल्याला विकासाचे राजकारण करायचे आहे, आकसाचे राजकारण नाही. याला कोणीही घाबरू नये. या सभेमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सर्वसामान्य जनतेने माझे काही चुकते का हे पाहावे. काही जण आपल्याला त्रास देत असले तरी, माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला विसरणार नाही. ही जनताच माझी मायबाप आहे.” गणेशोत्सवात शांतता राखण्याचे आवाहन करत, हा हल्ला पोलीस प्रशासनाकडून तपासला जाईल आणि सूत्रधारांचा शोध लागेल, असे खताळ यांनी सांगितले.

आमदार विठ्ठल लंघे यांचे तीव्र मत

आमदार विठ्ठल लंघे यांनी बोलताना सांगितले की, राजकीय द्वेषापोटीच आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्यात आला. “तालुक्यातील चाळीस वर्षे जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत आणि आता दुसरा आमदार प्रश्न सोडवत आहे, ही पोटदुखी सहन झाली नाही म्हणून असे उद्योग केले जात आहेत,” असा घणाघात लंघे यांनी केला. संपूर्ण सरकार आमदार खताळ यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, या हल्लेखोरांचा मागचा सूत्रधार शोधला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

या घटनेमुळे संगमनेरमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed