जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ, उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट
प्रवरानगर । झुंझार न्यूज
प्रवरा अभिमानास्पद वाटचालीस आणखी एक मैलाचा दगड ठरवत, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७६व्या गळीत हंगामाचा (२०२५ – २६) शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि ह.भ.प. उध्दव महाराज मंडलिक यांच्या शुभहस्ते गव्हाणीत ऊस टाकून या हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखान्याने नुकत्याच केलेल्या विस्तारीत प्रकल्पाचे कौतुक केले. या विस्तारामुळे कारखान्याची गाळप क्षमता वाढली असून, चालू हंगामात उच्चांकी गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. विखे पाटील पुढे म्हणाले, “यंदा पाण्याची उपलब्धता चांगली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी हेक्टरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.
ज्येष्ठ नेते श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, प्रवरा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. भास्कराव खर्डे, चेअरमन श्री. नंदूशेठ राठी, श्री. शिवाजीराव जोंधळे यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ, विविध संस्थांचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे परिसरातील शेतकरी आणि साखर उद्योगाशी संबंधित घटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढीव गाळप क्षमता आणि चांगल्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे या हंगामात शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.