कोपरगाव मतदारसंघातील दोन महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था आणि अपूर्ण कामांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. झगडे फाटा – रांजणगाव देशमुख रस्त्याची (राज्य मार्ग 65) अक्षरशः चाळण झाली असून, सावळीविहीर – कोपरगाव रस्त्याचे (राष्ट्रीय महामार्ग 752 जी) काम थोडे अपूर्ण असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या गंभीर प्रश्नांची दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह दोन्ही रस्त्यांची पाहणी केली आणि तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.
झगडे फाटा – रांजणगाव देशमुख रस्ता (राज्य मार्ग 65) हा कोपरगाव मतदारसंघातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक होत असल्यामुळे तो लवकर खराब होत आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आमदार काळे यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आणि या रस्त्यासाठी भरीव निधी मिळवून त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. त्यांनी स्वतः या रस्त्याच्या कामासाठी विविध योजनांमधून निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव दाखल केले असून, जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांच्या स्तरावर यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली.
सावळीविहीर – कोपरगाव या राष्ट्रीय महामार्ग 752 जी साठी 191 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, कामालाही जोरदार सुरुवात झाली होती. मात्र, पुणतांबा फाटा आणि बेट नाका या ठिकाणी जमीन अधिग्रहणाचे काम प्रलंबित असल्यामुळे रस्त्याचे काम थांबले आहे. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आमदार काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून, जमीन अधिग्रहणातील अडचणी सोडवून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.
या पाहणी दौऱ्यात आमदार आशुतोष काळे आणि जिल्हाधिकारी डॉ. पंकजज आशिया यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर. वर्पे, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार महेशजी सावंत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी ए.एल. जमाले, पी.पी. गायकवाड, अक्षयजी शिसोदे, व्ही.व्ही. पालवे, आर.पी. गंभीरे, आर.ए. जाधव, व्ही.व्ही. माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता वर्षराजजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार आशुतोष काळे यांनी दोन्ही रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त केली.