आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी अजमपूर परिसरात बिबट्याच्या दहशतीने कळस गाठला आहे. बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने एका शेतकऱ्याच्या बंदिस्त गोठ्यात घुसून अक्षरशः हत्याकांड घडवले. या हल्ल्यात गरीब शेतकऱ्याचे ७ बोकड जागीच ठार झाले असून ३ बोकड गंभीर जखमी झाले आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पिंपरी लौकी येथील अल्पभूधारक शेतकरी भागवत भिमाजी लावरे यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता नेहमीप्रमाणे लावरे हे आपल्या काही शेळ्या घेऊन चरायला रानात गेले होते. यावेळी त्यांच्या घराशेजारील बंदिस्त गोठ्यात १० ते १२ बोकड बांधलेले होते. दुपारच्या वेळी घरी कोणीही नसल्याची संधी साधत दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट जाळीवरून उडी मारून गोठ्यात प्रवेश केला. बिबट्याने आतमध्ये असलेल्या बोकडांवर क्रूर हल्ला चढवला. यामध्ये ७ बोकड जागीच ठार झाले, तर ३ बोकडांना बिबट्याने लचके तोडून गंभीर जखमी केले.

घटनेची माहिती मिळताच गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा भाजपाचे सचिव भारतराव गीते यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी लावरे कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. आपल्या उपजीविकेचे साधनच हिरावले गेल्याने शेतकरी आणि त्यांची पत्नी, मुले ओक्साबोक्सी रडत होती.
भारतराव गीते यांनी तत्परता दाखवत वन विभाग आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नागरगोजे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि जखमी बोकडांवर तातडीने उपचार सुरू केले. मात्र, जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने ती वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले. भारतराव गीते यांनी या घटनेची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयाला दिली असून, संबंधित शेतकऱ्याला तातडीने शासकीय मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.

सध्या पिंपरी लौकी गावात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळ्या मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सध्या कांदा काढणी आणि कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे, मात्र बिबट्याच्या धास्तीने महिला मजूर आणि शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत. जनावरांसाठी चारा आणणेही कठीण झाले आहे.
वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जर लवकर उपाययोजना केली नाही, तर ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा सरपंच सौ. संगीता गीते, उपसरपंच बाजीराव गीते, कार्यकर्ते भाऊसाहेब मुंढे, शिवाजी बोंद्रे, रमेशराव कदम, सुभाषराव मुंढे, भाऊसाहेब दराडी, नवनाथ दातीर, संतोष गिते, भिकाशेठ गिते, प्रभाकर दातीर, संपतराव कदम, सीताराम दातीर, रमेश गिते, गणपत गिते, दौलत दातीर, भीमराज गिते, सीताराम गिते व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सध्या रब्बी हंगाम सुरू असून गहू आणि मका लागवडीसाठी पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. मात्र, कृषी पंपांना रात्रीचा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याच्या भीतीमुळे आणि कडाक्याच्या थंडीमुळे पिकांना पाणी देणे जीवघेणे ठरत आहे. त्यामुळे शासनाने रात्रीऐवजी दिवसा पाच तास सलग वीज पुरवठा करावा, अशी आग्रही मागणी भारतराव गीते यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
पिंपरी लौकी व पानोडी शिवावर बिबट्याचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट दिसत येत असून कदम वस्ती , मुंढे व स्ती , तळेकर वस्ती , बोंद्रे वस्ती , सय्यद वस्ती , धानापुणे वस्ती बिबट्याच्या दहशती खाली असून एक महिन्यापुर्वीचं बोंद्रेवस्ती वरुन एक मादी व पिल्लू जेलबंद झाले असताना पुन्हा एकदा एक नव्हे तर तीन तीन बिबट्या लोकांना आढळून येत आहे .



