• जनतेतील संभ्रम दूर करण्यासाठी तातडीने बैठक बोलवण्याची विनंती

 

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 


पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गात अचानक बदल करण्यात आल्याच्या चर्चेमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी राज्याचे महसूल तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सविस्तर पत्र लिहून, “सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय रेल्वे मार्गाबाबत कोणतेही अंतिम निर्णय घेऊ नयेत,” अशी आग्रही मागणी केली आहे. तसेच, या विषयावर चर्चा करण्यासाठी तातडीने बैठक बोलवावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

 

 

संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पावर चर्चा झाली होती. या चर्चेदरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गात बदल करून हा मार्ग शिर्डीवरून नेण्याबाबतचे संकेत मिळाले. या माहितीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रामुख्याने ज्या भागातून मूळ मार्ग जाणार होता, त्या भागातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रमाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ना. विखे पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे.

 

 

 

प्रकल्पाच्या पहिल्या आणि मूळ आराखड्यानुसार हा रेल्वे मार्ग पुणे, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर ते नाशिक असा निश्चित करण्यात आला होता. या नियोजित मार्गासाठी जमिनीचे भूसंपादन करण्याची प्रक्रियाही पार पडली होती. असे असताना अचानक मार्गात बदल झाल्याची बाब समोर येणे, हे सर्वांसाठीच धक्कादायक आणि आश्चर्यकारक असल्याचे ना. विखे पाटील यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.

 

यापूर्वी तयार करण्यात आलेल्या रेल्वे प्रकल्पाच्या आराखड्यातील बदलाबाबत जिल्ह्यातील कोणत्याही लोकसभा किंवा विधानसभा सदस्यांशी चर्चा करण्यात आलेली नाही. प्रकल्प मार्गात कोणताही बदल करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे अत्यंत गरजेचे होते. परंतु, अशी कोणतीही चर्चा न झाल्याने आता लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे मार्गाबाबत जनतेमध्ये निर्माण झालेला संभ्रम आणि असंतोष दूर करणे आवश्यक असल्याचे गांभीर्य मंत्री विखे पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

 

 

 

प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत जनतेची पहिल्यापासून असलेली मागणी विचारात घेणे गरजेचे आहे. यासाठी आपण तातडीने संबंधित सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी. तसेच लोकप्रतिनिधींशी चर्चा करून, त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत कोणतेही निर्णय करू नयेत, अशी कळकळीची विनंती ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्राद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना केली आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *