दाढबुद्रुक । झुंझार न्यूज
श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान, दाढ बुद्रुक यांच्या वतीने आयोजित ‘श्री साई सच्चरित पारायण’ आणि ‘सन्मान नारीशक्तीचा’ भव्य संगीतमय देवी भागवत कथा निरुपण सोहळा सध्या मोठ्या उत्साहात पार पडत आहे. २५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात ह.भ.प. साध्वी सोनालीताई करपे यांच्या सुमधूर वाणीतून कथेचे चौथे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी भाविकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे.

भाकरी बनवण्यासाठी २५० ते ३०० महिलांचे निस्वार्थी योगदान
या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा सक्रिय आणि उत्साही सहभाग. ‘सन्मान नारीशक्तीचा’ हा केवळ विषय नसून तो प्रत्यक्ष कृतीत उतरताना दिसत आहे. दररोज दिवसभर घरची कामे आटपून संध्याकाळी २५० ते ३०० महिला भगिनी महाप्रसादासाठी भाकरी बनवण्याच्या कामात स्वतःला झोकून देत आहेत. महिलांच्या या निस्वार्थी सेवेचे कौतुक करताना साध्वी सोनालीताई करपे म्हणाल्या की, “भाकरी बनवण्यामागचा हा शुद्ध भाव पाहून पंगतीत साक्षात देव सुद्धा प्रसाद घेण्यास येत असतील.

माणुसकी आणि सत्कर्माचा जागर
कथा निरुपण करताना साध्वी सोनालीताई यांनी मानवी जीवनातील सत्कर्माचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “आपल्याला मिळालेला मनुष्य जन्म सत्कारणी लावण्यासाठी सुवर्णदान, अन्नदान, भूदान, जलदान, वस्त्रदान, औषधी दान, अभय दान, रक्तदान, सेवा दान, कन्या दान, गो दान आणि विद्या दान या १२ प्रकारच्या दानांचा अवलंब करावा. देवाने दिलेली ही इंद्रिये देश, देव आणि धर्माच्या सेवेसाठी वापरली तरच जीवनाचे सार्थक होईल.” सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी अध्यात्माची जोड आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

३ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
कथेच्या चौथ्या दिवशी सुमारे ३ हजार भाविकांनी आमटी-भाकरीच्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. हा महाप्रसाद तयार करण्यासाठी परिसरातील प्रसिद्ध अन्नपूर्णा श्री. रवी अण्णा बनसोडे व गणेश बनसोडे परिश्रम घेत आहेत. विशेष म्हणजे, गावातील तरुण मुलांच्या विविध ग्रुपनी आणि श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसाद वाढण्याची जबाबदारी पेलली आहे. पंगतीनंतर स्वच्छतेचे काम गणेश आणि दिनेश आरणे हे अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.

१७ वर्षांची धार्मिक परंपरा
दाढ बुद्रुक गावात गेल्या १७ वर्षांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाचा हा देवी भागवत कथा सोहळा पौष महिन्याच्या पवित्र काळात होत असल्याने ग्रामस्थ स्वतःला भाग्यवान समजत आहेत. देवीची भक्तीगीते आणि पात्रांच्या सादरीकरणामुळे भाविक मंत्रमुग्ध होत असून संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. योगेश तांबे पाटील व सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे. परिसरातील सर्व भाविकांनी या मंगलमय सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 647
