“जन्म आणि मृत्यूच्या प्रवासात आपण चंदनासारखे स्वतः झिजून जगाला सुगंध द्यायला हवा. जीवनाच्या गणितात जेव्हा आपण चांगुलपणाची बेरीज आणि वाईट विचारांची वजाबाकी करतो, तेव्हाच सुखाचा गुणाकार होतो. असे जीवनाचे गणित मांडताना चुकांचा भागाकार करुन धर्ममय आयुष्य जगण्याचा संकल्प करा. असे आवाहन संत अक्षय ऋषीजी महाराज यांनी अमृततुल्य प्रवचनातून केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे जैन धर्म स्थानकात गुरुवार दि. १ जानेवारी २०२६ रोजी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी महाराज यांचे शिष्य उपप्रवर्तक प. पू. श्री अक्षय ऋषीजी महाराज, अमृत ऋषीजी महाराज आणि गीतार्थ ऋषिजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महामांगलिक’, ‘दीक्षार्थी अभिनंदन’ आणि ‘वरघोडा’ (यात्रा) सोहळा मोठ्या मंगलमय तसेच धार्मिक वातावरणात संपन्न झाला.
गुरुवारी सकाळी सुम्मतीलाल गांधी यांच्या निवासस्थानापासून आकर्षक सजवलेल्या रथावर दीक्षार्थी मुमुक्षू कु. हर्षाजी शैलेश पारख (संगमनेर) व कु. चैतालीजी बोकडीया (मालेगाव कॅम्प) यांची भव्य अभिनंदन यात्रा काढण्यात आली होती.
या मिरवणुकीच्या अग्रभागी पारंपरिक वाद्यांचे गजर होता. यामध्ये सनई आणि बॅड पथकाने वातावरणात एक वेगळाच उत्साह भरला होता. हातात जैन धर्माचा गौरवशाली ध्वज घेतलेली मुले, डोक्यावर मंगल कलश धारण केलेल्या सुवासिनी आणि मुली, तसेच पारंपरिक पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमधील पुरुष आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भाविकांमुळे संपूर्ण आश्वी गाव भक्तिमय झाले होते. ही मिरवणूक जैन धर्म स्थानकात पोहोचल्यानंतर कन्या आणि बाल मंडळाच्या सदस्यांनी दीक्षार्थीचे अत्यंत उत्साही वातावरणात धार्मिक – सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून स्वागत केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपा गोडगे यांनी केले. उपस्थित भाविकांसाठी सुम्मतीलाल अविनाश गांधी परिवारातर्फे ‘गौतम प्रसादी’चे (महाप्रसाद) आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान या सोहळ्याला जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुम्मतीलाल गांधी, प्रवरा बॅकेचे संचालक संजय गांधी, राजेंद्र गदीया, शैलेश पारख, पारसमल चोरडिया, राजेंद्र गदीया यांच्यासह संगमनेर, आश्वी, लोणी, कोल्हार, साकूर, चाळीसगाव आणि अहिल्यानगर येथून जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर, जैन श्रावक संघ, नवकार ग्रुप, उड्डाण ग्रुप, महिला मंडळ आणि कन्या मंडळ यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.