पोलीस आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाहणीत

आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, आश्वी पोलिसांनी आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर, हा प्रकार केवळ गैरसमजुतीतून झाल्याचे आणि प्रतिमांचा कोणताही अवमान झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जुन्या प्रतिमा जिर्ण झाल्याने त्या जागी नवीन प्रतिमा बसवण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

संजय मुन्तोंडे यांनी शिबलापूर ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याचा अर्ज आश्वी पोलीस ठाण्यात दिला होता. या अर्जाची दखल घेत आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सभागृहात प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकमान्य टिळक आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या प्रतिमा आढळून आल्या.

पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार, ग्रामपंचायतीने जुन्या प्रतिमा जिर्ण झाल्यामुळे त्या बदलण्याचा अधिकृत ठराव केला होता. जुन्या प्रतिमा काढून त्या जागी नवीन, मोठ्या आणि देखण्या प्रतिमा सन्मानाने लावण्यात आल्या आहेत. तसेच, जुन्या झालेल्या प्रतिमा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याचे पाहणीत दिसून आले. या प्रक्रियेत महापुरुषांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

या प्रकरणाची माहिती वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांना मिळताच, त्यांनी तातडीने स्थानिक पदाधिकाऱ्यांना पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तालुकाध्यक्ष वैभव मोकळ, कार्याध्यक्ष गोरक्ष जगताप, संघटक सागर मोकळ, उपाध्यक्ष बापूसाहेब मोरे, योगेश सातपुते यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली.

 

यावेळी वैभव मोकळ यांनी सांगितले की, “आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली असता, ग्रामपंचायतीने ठराव करून जुन्या प्रतिमांच्या जागी नवीन प्रतिमा लावल्याचे दिसून आले. हा प्रकार केवळ गैरसमजुतीतून झाला असून कोणाचाही अवमान करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा अहवाल आम्ही ॲड. प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे.

सरपंच प्रमोद बोंद्रे आणि उपसरपंच दिलीप मुन्तोंडे यांनी सांगितले की, “महापुरुषांच्या प्रतिमा जिर्ण झाल्या होत्या, त्यामुळे त्या बदलणे आवश्यक होते. आम्ही केवळ नवीन प्रतिमा लावून जुन्या सुरक्षित ठेवल्या होत्या. मात्र, सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून चुकीची माहिती पसरल्याने आमची बदनामी झाली. आम्ही स्वतःहून पोलिसांना पाचारण करून पंचनामा करण्याची विनंती केली होती, जेणेकरून सत्य समोर येईल.

 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिंदे, ग्रामसेवक सुरेंद्र बाम्हणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आश्वी पोलिसांनी केलेल्या या तत्पर कारवाईमुळे आणि वंचित बहुजन आघाडीच्या समन्वयामुळे शिबलापूरमधील तणाव निवळला असून सत्य परिस्थिती समोर आली आहे.

 

तक्रारदार संजय मुन्तोंडे यांनी थेट ॲड. प्रकाश आंबेडकर यांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आंबेडकरांनी तातडीने कार्यकर्त्यांना घटनास्थळी धाडले. मात्र, कार्यकर्त्यांच्या अहवालानंतर हा केवळ प्रशासकीय निर्णयाचा आणि गैरसमजाचा भाग असल्याचे स्पष्ट झाल्याने या वादावर पडदा पडला आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *