१५ ते २१ जानेवारी : खरेदी, मनोरंजन आणि मेजवानीचा संगम

 

संगमनेर । झुंझार न्यूज 

 

नवउद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ग्राहकांना नव्या उद्योगांची, दर्जेदार उत्पादनांची व सेवांची प्रत्यक्ष माहिती देणे आणि त्यातून त्यांच्या गरजा पूर्ण करत स्थानिक उद्योजकांना प्रगतीची नवी दिशा देणे या त्रिसूत्री उद्देशाने गेल्या १८ वर्षांपासून सातत्याने संगमनेरच्या सामाजिक–व्यावसायिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या वतीने भव्य ‘सफायर बिझनेस एक्स्पो’चे आयोजन करण्यात येत आहे.


चोखंदळ ग्राहकांच्या अपेक्षांनुसार, दर्जेदार उत्पादने, सेवा आणि मनोरंजनाचा उत्तम संगम असणारा हा एक्स्पो संगमनेर परिसरातील एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळखला जातो.

गुरुवार दिनांक १५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या भव्य बिझनेस एक्स्पोचे उद्घाटन संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ, संगमनेर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे यांच्या हस्ते, तर ग्लोबल अ‍ॅक्शन टीम चेअरमन सुनीताभाभी मालपाणी व लायन्स संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी, माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १० वाजता मालपाणी लॉन्स, लक्ष्मी रोड, संगमनेर येथे संपन्न होणार आहे.

या एक्स्पोमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून नामांकित तसेच नवोदित उद्योजकांचे स्टॉल्स उभारण्यात येणार असून फन, फूड आणि शॉपिंग ही या एक्स्पोची मुख्य संकल्पना आहे. तरुण, तरुणी, पुरुष, महिला यांच्यासाठी खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणाऱ्या या एक्स्पोमध्ये लहानग्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी विविध फन गेम्स, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ठेवण्यात आले आहेत.


लायन्स सफायरचे संस्थापक अध्यक्ष एम.जे.एफ. गिरीश मालपाणी, प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारी, प्रकल्प प्रमुख प्रफुल्ल खिंवसरा, अध्यक्ष व प्रकल्प प्रमुख अ‍ॅड. कल्याण कासट, सेक्रेटरी सुमित मणियार, खजिनदार नामदेव मुळे व त्यांच्या संपूर्ण टीमने मोठ्या परिश्रमातून संगमनेरकरांसाठी ही व्यावसायिक पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. 


दरवर्षी या बिझनेस एक्स्पोला संगमनेरकरांचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद मिळतो. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या एक्स्पोमध्ये खरेदी, खाणे आणि मनोरंजनाचा आनंद घेतात. यावर्षी हा एक्स्पो संपूर्ण एक आठवडा म्हणजे १५ ते २१ जानेवारीपर्यंत चालणार असून सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत प्रवेश मोफत, तर सायंकाळी ४ नंतर केवळ २० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. रात्री ९.३० वाजेपर्यंत नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे.


उदयोन्मुख उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणारा, ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध वस्तू व सेवांची माहिती देणारा, तसेच विविध खाद्यपदार्थांची चव अनुभवण्याची संधी देणारा ‘सफायर बिझनेस एक्स्पो’ हा आज राज्यभरात एक विश्वासार्ह व नावाजलेला ब्रँड बनला आहे. व्यापारवृद्धी, व्यवसायाप्रती कटिबद्धता आणि सेवा या त्रिसूत्रीचा उत्तम संयोग साधणारा हा उपक्रम आहे.

तरी संगमनेर, अकोले व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या ‘सफायर बिझनेस एक्स्पो’चा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक गिरीश मालपाणी व त्यांच्या संपूर्ण टीमने केले आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *