आश्वी । झुंझार न्यूज 

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी सुधाकर प्रभाकर रोहम यांची सलग पाचव्यांदा, तर जिल्हा सरचिटणीस पदी जोर्वे येथील सेवानिवृत्त एमएसईबी अधिकारी व आंबेडकर चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्व दादू विष्णू यादव यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. संगमनेर येथील हॉटेल सेलिब्रेशनमध्ये आयोजित पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जकाप्पा कांबळे यांच्या आदेशानुसार या निवडी करण्यात आल्या आहेत. मुंबई येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत डॉ. राजेंद्र गवई यांनी या नावांची अधिकृत घोषणा केली होती, त्याचे नियुक्ती पत्र आज संगमनेर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

निवडीनंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुधाकर रोहम यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले की, “लवकरच जिल्हा कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल केले जातील. पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य पदे दिली जातील; मात्र ज्यांनी पदे घेऊनही पक्षासाठी काम केले नाही, अशा पदाधिकाऱ्यांचा विचार केला जाणार नाही. त्यांची पदे काढून घेतली जातील. तर

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीबाबत रोहम म्हणाले की , संगमनेर पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने, या जागेवर पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी गट-तट विसरून कामाला लागावे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ७५ पैकी १७ राखीव जागांवर आणि पंचायत समितीच्या दीडशे जागांपैकी ३० ते ३५ जागांवर पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) ची आघाडी काँग्रेस पक्षासोबत असून, सन्मानजनक जागा मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींची काँग्रेस नेत्यांशी बोलणी सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“प्रत्येक गावात पक्षाची शाखा उघडली पाहिजे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता, नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि शासनाच्या विविध योजना तळागाळातील गरीब जनतेपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे,” असे आवाहन रोहम यांनी केले.

या बैठकीला उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र घायवट, ज्येष्ठ नेते सुरेश देठे, विष्णू हरनामी, उत्तम साळवे, साहेबराव यादव, पक्षाचे कायदेशीर सल्लागार ॲड. रमेश बनसोडे, जालिंदर भरुंडे, तुकाराम यादव, वसंत खरात, बाळासाहेब मोकळ, गोरक्षनाथ बनसोडे, अरुण विघे यांसह जिल्हयातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *