समसमान संधी देत पालकमंत्री विखे पाटलांनी साधला राजकीय समतोल!
शिर्डी । झुंझार न्यूज
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान आणि आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी नगर परिषदेच्या सत्ताकारणात पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या राजकीय परिपक्वतेचा पुन्हा एकदा प्रत्यय दिला आहे. महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांना—भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट)—विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीत समसमान संधी देत ‘पॉवर बॅलन्स’ साधला आहे. या निर्णयामुळे शिर्डीच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
नुकत्याच झालेल्या शिर्डी नगर परिषद निवडणुकीत २३ पैकी १९ जागांवर महायुतीने दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जनतेने भाजपच्या जयश्रीताई थोरात यांच्यावर विश्वास टाकत त्यांची निवड केली. त्यानंतर, पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ नगरसेवक अभयराजे शेळके यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लावून सर्वांनाच सुखद धक्का दिला होता.

उपनगराध्यक्ष अभय शेळके यांना पाच पंचवार्षिक निवडणुकांचा दांडगा अनुभव आहे. त्यांच्या पत्नी व माजी नगराध्यक्ष योगिताताई शेळके यांच्या कार्यकाळात शिर्डीला ‘स्वच्छ शहर’ म्हणून राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले होते. आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, शेळके यांच्या अनुभवाचा आणि विकासाभिमुख दृष्टीकोनाचा शिर्डी शहराला मोठा फायदा होणार आहे.

विषय समित्यांचे वाटप आणि राजकीय समतोल
नगर परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या निवड प्रक्रियेत महायुतीच्या नेत्यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन करत सत्तेचा समतोल राखला. विविध समित्यांच्या सभापतींची घोषणा खालीलप्रमाणे करण्यात आली:
नियोजन आणि विकास समिती उपनगराध्यक्ष अभयराजे शेळके (भाजप) यांच्याकडे या महत्त्वपूर्ण समितीची धुरा सोपवण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम समिती: भाजपचे अनुभवी नगरसेवक अरविंद कोते यांची सभापतीपदी निवड करण्यात आली.
सार्वजनिक आरोग्य समिती: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगरसेवक दीपक गोंदकर यांच्याकडे आरोग्य विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पाणीपुरवठा समिती: भाजपच्या नगरसेविका कोमल बोराडे यांची या समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे.
महिला व बालकल्याण समिती: शिवसेना (शिंदे गट) च्या नगरसेविका सुनीता वसंत गोंदकर यांची निवड करून मित्रपक्षाला सत्तेत योग्य वाटा देण्यात आला आहे.



