संगमनेरमध्ये शिवसेना सामाजिक न्याय विभागाकडून भावपूर्ण श्रद्धांजली

संगमनेर । झुंझार न्यूज

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन आणि उत्पादन शुल्क मंत्री नामदार अजितदादा पवार यांचे काल अपघाती निधन झाले. या धक्कादायक बातमीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर शोककळा पसरली आहे. अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील एक अभ्यासू नेतृत्व, उत्तम वक्ता आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असणारा एक लोकनेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, संगमनेर येथे शिवसेना सामाजिक न्याय विभाग, अहिल्यानगरच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

संगमनेर येथील शिवसेना शहर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत जिल्हाप्रमुख किशोरभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अजितदादांच्या संगमनेर शहराशी असलेल्या आठवणींना उजाळा दिला.

‘जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा नेता

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख किशोरभाऊ वाघमारे म्हणाले की, “अजितदादा पवार हे केवळ एक मंत्री नव्हते, तर ते जनतेच्या मनातील जनसेवक होते. प्रशासनावर त्यांची असलेली पकड आणि कामाचा उरका यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. असा अभ्यासपूर्ण नेता पुन्हा होणे शक्य नाही.”

अजितदादांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, दादा हे नेहमीच जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत असत. सकाळच्या पहाटेपासून कामाला सुरुवात करणारा आणि फाईलवर तत्काळ निर्णय घेणारा असा हा धडाडीचा नेता आज आपल्यातून गेल्याचे दुःख मोठे आहे. संगमनेर शहराच्या आणि तालुक्याच्या अनेक विकासकामांत त्यांचे मार्गदर्शन लाभले होते.

या श्रद्धांजली सभेला शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे संगमनेर तालुकाप्रमुख गौतम रोहम, शहरप्रमुख मधुकर वाघमारे, महिला आघाडी प्रमुख रूपालीताई रोहम, शहर महिला आघाडी प्रमुख रूपालीताई वाघमारे यांच्यासह विभागाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे व्यक्त केले.

अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील एक ‘दादा’ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *