महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे, रोखठोक आणि विकासकामांचा ध्यास असलेले नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामतीजवळ विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अत्यंत जवळच्या मित्राला आणि सहकाऱ्याला भावूक शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे. “दादा, तुम्ही आजवर कधीही वेळ चुकवली नव्हती, पण यावेळी मात्र चुकवलीत,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली.
शेवटची भेट आणि तिजोरीची काळजी
अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची शेवटची भेट मंगळवारी (२७ जानेवारी) मंत्रिमंडळ बैठकीत झाली होती. त्यानंतर पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीतही दोघे एकत्र होते. राज्याच्या तिजोरीची सतत काळजी करणारा अर्थमंत्री म्हणून अजित पवारांची ओळख होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने ७६४ कोटी रुपये वाचवल्याचे कळल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला होता आणि “अशाच गोड बातम्या प्रत्येक बैठकीत देत जा,” अशी कोपरखळीही मुख्यमंत्र्यांना मारली होती. मात्र, ही त्यांची शेवटची बैठक ठरेल, अशी पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. बैठकीनंतर सुमारे पाऊण तास दोन्ही नेत्यांमध्ये दालनात गप्पा झाल्या होत्या.
मैत्री राजकारणापलीकडची
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील मैत्री राजकीय मतभेदांच्या पलीकडची होती. २०१९ पासून त्यांनी प्रशासनात एकत्र काम केले असले तरी, त्यापूर्वीही राज्यहिताच्या विषयांवर ते एकत्र असायचे. अजित पवार सभागृहात बोलताना अनेकदा फडणवीसांना ‘सीेएम साहेब’ म्हणून संबोधायचे आणि नंतर आपली चूक सुधारत ‘देवेंद्रजी’ म्हणायचे, ही आठवण मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितली.
कामाचा उरक आणि शिस्तबद्ध ‘दादा‘
अजित पवारांच्या कामाची पद्धत अत्यंत शिस्तबद्ध होती. सकाळी ७ वाजल्यापासून त्यांचा दिवस सुरू व्हायचा. फाईलवर एकतर ‘हो’ किंवा ‘नाही’, या पलीकडे ‘पाहतो-करतो’ अशी धरसोड वृत्ती त्यांना मान्य नव्हती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत येण्यापूर्वी प्रत्येक प्रस्तावाचा सखोल अभ्यास करून येणारे ते अभ्यासू नेते होते. नवीन सदस्यांना सभागृहाचे नियम आणि शिस्त लावण्यात त्यांचा मोठा वाटा होता. बांधकामाच्या गुणवत्तेबाबत ते इतके कडक होते की, पहाटे ६ वाजता स्वतः साईटवर जाऊन पाहणी करायचे. त्यांनी स्वतः लक्ष घालून उभारलेले बारामती मेडिकल कॉलेज हे त्यांच्या कामाच्या गुणवत्तेचा जिवंत पुरावा आहे.
क्रिकेट, गाणी आणि हळदीचे दूध
राजकारणाच्या पलीकडे अजित पवारांना क्रिकेट आणि गाण्यांची प्रचंड ओढ होती. क्रिकेटचा कोणताही सामना असला की मुख्यमंत्री आणि दादा एकमेकांकडून स्कोअरची विचारपूस करायचे. प्रवासात ते नेहमी प्रकृतीची काळजी घेत आणि आवर्जून हळद टाकलेले दूध पिण्याला पसंती देत. त्यांचा ‘सेन्स ऑफ ह्यूमर’ अफलातून होता; गंभीर विषयातही ते विनोद करून समोरच्याची ‘विकेट’ काढण्यात माहीर होते.
नियतीचा क्रूर खेळ
काही काळापूर्वी एका विमान प्रवासादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आयुष्यातील विमान अपघातांचे प्रसंग सांगितले होते. त्यावर दादांनी गमतीने पायलटला “मला खाली उतरवा” असे म्हटले होते. मात्र, ज्या विमान अपघाताची भीती गमतीने व्यक्त केली होती, त्याच अपघाताने दादांना हिरावून नेले, ही महाराष्ट्राची मोठी शोकांतिका असल्याची भावना फडणवीस यांनी व्यक्त केली.
“माझा जवळचा, दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला शोक व्यक्त केला. महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पर्वाचा असा अकाली अंत झाल्याने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.