मुंबई । झुंझार न्यूज
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे व्यक्तिमत्व, स्पष्टवक्ते आणि कामाचा प्रचंड उरक असलेले नेते अजित पवार (अजितदादा) यांच्या जाण्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे तरुण आमदार सत्यजीत तांबे यांनी एक अत्यंत भावूक ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या ऐतिहासिक संदर्भाचा उल्लेख केला आहे. “लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे, असे बाजीप्रभू देशपांडे बोलल्याची नोंद इतिहासात आहे,” या शब्दांत त्यांनी अजितदादांच्या नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले. एक ‘कर्ता’ माणूस गेल्यामुळे भविष्यातील सर्व राजकीय आणि सामाजिक समीकरणे बदलून जातात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

स्वभावातील पारदर्शकता आणि ‘सॉरी’ म्हणणारा नेता
अजितदादांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या स्वभावावर भाष्य करताना तांबे यांनी लिहिले की, “लवकर चिडणारा, फटकळ बोलणारा आणि अत्यंत स्पष्टवक्ता, पण तेवढ्याच लवकर आपली चूक मान्य करून ‘सॉरी’ म्हणणारा नेता आज आपल्यातून गेला आहे.” दादांच्या स्वभावातील हाच खरेपणा त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरवत होता. चुका झाल्यावर त्या जाहीरपणे मान्य करण्याचे धाडस केवळ त्यांच्यासारख्याच नेत्याकडे असू शकते, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
अजितदादांच्या जाण्याने सत्यजीत तांबे प्रचंड अस्वस्थ झाले असून, त्यांनी आपल्या ट्विटच्या शेवटी “निःशब्द! Life is so uncertain” (जीवन किती अनिश्चित आहे) असे म्हटले आहे. ही बातमी पचवणे कठीण असल्याचे त्यांच्या शब्दांतून स्पष्टपणे जाणवते.
अजितदादा हे केवळ एका पक्षाचे नेते नसून, प्रशासनावर पकड असलेला एक कणखर चेहरा होते. त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पर्वाचा अंत झाल्याची भावना सर्वसामान्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर तांबे यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला असून, “राजकारणातील हक्काचा माणूस हरपला,” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

