बेल्हे । झुंझार न्यूज

बेंगळुरू येथे आयोजित ‘अन्वेषण’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेत जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालय आणि समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे सादर केलेल्या ‘व्हर्साटाईल सर्व्हिस रोबोट’ या प्रकल्पास देशात द्वितीय क्रमांक मिळाला असून, ४० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.

सॅमसंग आणि अगस्त्या फाऊंडेशनचा उपक्रम

सॅमसंग सेमीकंडक्टर इंडिया रिसर्च (SSIR) यांच्या वतीने पुरस्कृत आणि अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन, बेंगळुरू यांच्या सहयोगाने या विज्ञान आणि तंत्रज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शालेय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील कल्पकता, नवउपक्रमशीलता आणि तांत्रिक कौशल्याला वाव देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या राष्ट्रीय स्पर्धेत राज्यभरातील अनेक नामांकित संस्थांनी सहभाग नोंदवला होता.

अष्टपैलू ‘स्मार्ट सर्व्हिस रोबोट’ची वैशिष्ट्ये

समर्थच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेला हा रोबोट अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. हा रोबोट शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, कार्यालये आणि उद्योगांमध्ये सेवा देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
कार्यप्रणाली: हा रोबोट सेन्सर्स आणि मायक्रोकॉन्ट्रोलरच्या मदतीने पूर्णपणे स्वयंचलित (Automated) पद्धतीने कार्य करतो.


AI आणि फेस रेकग्निशन: यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा वापर करण्यात आला असून, तो विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. तसेच मानवी चेहरा ओळखण्याची (Face Recognition) यंत्रणाही यात विकसित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत समर्थ अभियांत्रिकीमधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी प्रीतम बर्वे व श्रुती वाकचौरे, तसेच समर्थ गुरुकुलचे विद्यार्थी अवधूत भांबेरे व श्रद्धा आग्रे यांच्या संघाने हे यश मिळवले.
या प्रकल्पासाठी विभागप्रमुख प्रा. निर्मल कोठारी, प्रा. प्रियांका लोखंडे, प्रा. सुचिता साबळे, प्रा. कौस्तुभ मेहेर तसेच गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे, एच. पी. नरसुडे, संजीवनी गायकवाड आणि वैशाली सरोदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल समर्थ संकुलाचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या या यशामुळे जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed