भाजप तालुका सचिव रेखा कोटकर यांच्या पाठपुराव्याला यश; पालकमंत्री विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांचे मानले आभार !

संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या हजारो कामगारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तांत्रिक कारणांमुळे रखडलेली कामगारांच्या पाल्यांची शिष्यवृत्ती आणि इतर कल्याणकारी योजनांचे लाभ अखेर सुरू झाले आहेत. भाजप तालुका सचिव सौ. रेखा सोमनाथ कोटकर यांनी या प्रश्नी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, त्यांनी या यशाबद्दल राज्याचे महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांचे आभार मानले आहेत.


संगमनेर तालुक्यातील हजारो बांधकाम कामगार शासनाच्या कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत आहेत. या कामगारांच्या मुलांना मिळणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती, विविध कौशल्य प्रशिक्षणे आणि इतर आर्थिक लाभ गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित होते. आर्थिक मदतीअभावी अनेक कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला होता. वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने कामगार वर्गामध्ये मोठा असंतोष आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

ही समस्या लक्षात घेताच भाजप तालुका सचिव सौ. रेखा कोटकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी प्रत्यक्ष कामगारांच्या भेटी घेऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी तातडीने पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. “गोरगरीब कामगारांचे हक्काचे पैसे तांत्रिक कारणांमुळे अडकून राहणे अन्यायकारक आहे, तरी यात तातडीने हस्तक्षेप करावा,” अशी विनंती कोटकर यांनी केली होती.

रेखा कोटकर यांच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत, नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या. प्रलंबित अर्जांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती व इतर लाभ जमा करण्याची प्रक्रिया जलद गतीने करण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशानंतर प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली झाल्या आणि प्रलंबित योजनांची अंमलबजावणी पुन्हा सुरू झाली.


योजनांचे लाभ मिळण्यास सुरुवात झाल्याने तालुक्यातील बांधकाम कामगारांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. विशेषतः शैक्षणिक वर्षाच्या मध्यात शिष्यवृत्ती मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. कामगारांच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहिल्याबद्दल आणि हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सौ. रेखा सोमनाथ कोटकर यांनी पालकमंत्री विखे पाटील व आमदार खताळ पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत. तालुक्यातून या निर्णयाचे स्वागत होत असून कामगारांनीही समाधान व्यक्त केले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *