विमान अपघात चौकशीवरूनही साधला निशाणा
संगमनेर । झुंझार न्यूज
विमान अपघाताची माहिती समोर येणे हा पवार कुटुंबाचा अधिकार असला तरी, हयात असताना तुम्ही अजितदादांशी कसे वागलात आणि त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी का मिळू दिली नाही, या प्रश्नांची उत्तरेही राज्याला मिळाली पाहिजेत, अशा शेलक्या शब्दांत राज्याचे महसूल व जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. संगमनेर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

रोजची मांडणी क्लेषदायक
विमान अपघाताच्या संदर्भात बोलताना विखे पाटील म्हणाले की, या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी होऊन सत्य समोर यावे, अशी पवार कुटुंबाची जशी अपेक्षा आहे, तशीच ती राज्यातील जनतेचीही आहे. सध्या या अपघाताची चौकशी सुरू आहे. पवार कुटुंबाने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, त्याबाबत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील आणि अंतिम सत्य समोर येईलच. मात्र, या विषयावर आमदार रोहित पवार ज्या पद्धतीने रोज माध्यमांपुढे येऊन मांडणी करत आहेत, ते अत्यंत क्लेषदायक असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.

स्व. अजितदादांच्या निधनाचे आम्हा सर्वांनाच मोठे दुःख आहे, असे सांगतानाच विखे पाटील यांनी राजकीय प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले, “अजितदादा हयात असताना तुम्ही त्यांच्याशी कसे वागलात? त्यांना काकांनी (शरद पवार) कशी वागणूक दिली? राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक संख्याबळ असतानाही अजितदादांना मुख्यमंत्री होण्यापासून कोणी रोखले? या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रातील जनतेला मिळाली पाहिजेत.”
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती देताना विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रश्नावरही भाष्य केले. २०१९ साली संगमनेर-अकोले-देवठाण हा मार्ग निश्चित झाला होता, मात्र २०२१ मध्ये या मार्गात कोणी आणि का बदल केला, हे अनाकलनीय असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी महामंडळ स्थापन झाले होते आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्तीही झाली होती. तरीही झालेल्या या बदलामुळे प्रकल्पात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी विशेष बैठक
जमिनीचे झालेले अधिग्रहण आणि खोडद येथील जीएमआरटी (GMRT) केंद्राच्या तांत्रिक अडचणींमुळे या मार्गाचा फेरविचार करण्याची ग्वाही रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. आगामी अधिवेशन काळात पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात आणि जिल्ह्यातील इतर रेल्वे प्रश्नांबाबत राज्य सरकार व महारेलच्या अधिकाऱ्यांसमवेत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मूळ रेल्वे मार्गच संगमनेर आणि अकोले या दोन्ही तालुक्यांची जीवनरेषा असून तोच मार्ग कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ना. विखे पाटील यांनी स्पष्ट केले

