शरदराव बनसोडे यांनी मांडल्या कामगारांच्या व्यथा

आश्वी । झुंझार न्यूज

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. डॉ. रामदास आठवले यांची राज्यसभा सदस्यपदी फेरनिवड झाल्यानंतर, त्यांनी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. याप्रसंगी आरपीआयचे तथा सामाजिक कार्यकर्ते शरदराव बनसोडे यांनी त्यांची भेट घेऊन मुळा प्रवरा इलेक्ट्रीक को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली व त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

मुळा प्रवरा संस्था ही एकेकाळी आशिया खंडातील ग्रामीण भागाला वीजपुरवठा करणारी एक अग्रगण्य संस्था होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे आणि परवाना रद्द झाल्यामुळे ही संस्था सध्या बंद अवस्थेत आहे. यामुळे या संस्थेवर अवलंबून असलेले शेकडो कामगार बेरोजगार झाले असून, त्यांचे ७ महिन्यांचे पगार आणि इतर शिल्लक रक्कम अद्याप मिळालेली नाही. शरदराव बनसोडे यांनी ना. आठवले यांचे लक्ष वेधले की, ही संस्था पुन्हा सुरू झाल्यास गोरगरीब जनतेला तात्काळ वीजपुरवठा मिळेल आणि कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल.

यावेळी शरदराव बनसोडे यांनी सांगितले की, मुळा प्रवरा संस्थेचा परवाना पुन्हा मिळवण्यासाठी आणि थकीत ‘समतोल’ रक्कम माफ करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित भाई शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. ही संस्था वाचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.


१९९७-९८ च्या काळात जेव्हा युतीचे शासन होते, तेव्हा तत्कालीन ऊर्जा मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे आणि ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संस्थेला मदत करून परवाना वाढवून दिला होता. त्याच धर्तीवर आताच्या महायुती सरकारनेही गोरगरीब कामगारांच्या हितासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. चर्चेदरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील पॅंथर चळवळ आणि जुन्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला.


कामगारांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर ना. डॉ. रामदास आठवले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. “मुळा प्रवराच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाठपुरावा करू,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.


या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) उपाध्यक्ष विजय वाकचौरे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, रिपब्लिकन नेते राजाभाऊ कापसे, भीमराव बागुल यांसह अहमदनगर जिल्ह्यातील आरपीआयचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *