ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आधुनिक नियोजनाची गरज; दूध उत्पादकांना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन

संगमनेर । झुंझार न्यूज

दुग्धव्यवसाय हा आता केवळ शेतीला जोडधंदा राहिलेला नसून, तो एक स्वतंत्र आणि मोठा उद्योग बनला आहे. मात्र, आजही अनेक शेतकरी ‘नुसतेच टाक चारा आणि काढ धारा’ या पारंपारिक मानसिकतेत अडकले आहेत. ही मानसिकता बदलून जोपर्यंत दूध उत्पादन व्यावसायिक दृष्टिकोनातून केले जात नाही, तोपर्यंत हा व्यवसाय खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरणार नाही,” असे प्रतिपादन संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजीत सिंह देशमुख यांनी केले.


एका विशेष कार्यक्रमात दूध उत्पादकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी दुग्धव्यवसायातील सद्यस्थिती, आव्हाने आणि भविष्यातील संधी यावर सविस्तर प्रकाश टाकला.


रणजीतसिंह देशमुख पुढे म्हणाले की, कष्टाला नियोजनाची जोड नसल्यास अपेक्षित नफा मिळत नाही. अनेक दूध उत्पादक जनावरांच्या आहारावर, आरोग्यावर आणि जातीवर शास्त्रीय पद्धतीने विचार करत नाहीत. केवळ चारा टाकला आणि दूध काढले, एवढ्यापुरताच हा व्यवसाय मर्यादित राहिला आहे. परंतु, जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा पाहता, दूध उत्पादकांनी आता व्यावसायिक व्यवस्थापन शिकणे काळाची गरज आहे.


दुग्धव्यवसाय सक्षम आणि शाश्वत करण्यासाठी देशमुख यांनी तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला

१. योग्य नियोजन: गोठ्याचे बांधकाम, जनावरांची निवड आणि संगोपन याचे आगाऊ नियोजन असावे.
२. शास्त्रीय व्यवस्थापन: जनावरांचा आहार, लसीकरण आणि स्वच्छता याकडे व्यावसायिक पद्धतीने लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य आहारामुळे उत्पादकता वाढते आणि खर्च कमी होतो.
३. बाजारपेठेची समज: दुधाला मिळणारा दर आणि बाजारातील मागणी यांचा ताळमेळ बसवता आला पाहिजे.

ग्रामीण भागातील अर्थचक्र प्रामुख्याने शेती आणि दुग्धव्यवसायावर अवलंबून असते. जर दूध उत्पादकांनी व्यावसायिक विचारसरणी स्वीकारली, तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. “दुग्धव्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जेव्हा हा व्यवसाय नफ्यात येईल, तेव्हाच ग्रामीण भागाचे चित्र बदलेल आणि तरुणांचा कल या व्यवसायाकडे वाढेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तंत्रज्ञानाचा वापर करा, दुधाची गुणवत्ता वाढवा आणि खर्चाचा हिशोब ठेवा. जो शेतकरी आपल्या गोठ्याचा हिशोब वहीवर मांडेल, तोच खरा व्यावसायिक दूध उत्पादक म्हणून यशस्वी होईल.

 रणजीतसिंह देशमुख 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *