शिर्डीत घेतलं मनोभावे दर्शन
शिर्डी । झुंझार न्यूज
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘थाला’ म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता अजित कुमार याने आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे भक्तीभावाने दर्शन घेतले. गेल्या काही दिवसांपासून दुबईतील युद्धजन्य परिस्थितीमुळे चर्चेत असलेला अजित कुमार सुखरूप भारतात परतल्यानंतर, त्याने थेट साईदरबारी हजेरी लावत कृतज्ञता व्यक्त केली.
अजित कुमारने आज सकाळी शिर्डीत दाखल होऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. केवळ समाधीच नव्हे, तर त्याने द्वारकामाई आणि गुरुस्थान मंदिरात जाऊनही दर्शन घेतले आणि काही काळ तिथे ध्यानस्थ बसला. या भेटीदरम्यान साईबाबा संस्थानच्या वतीने उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी अजित कुमारचा सत्कार केला. यावेळी त्याला साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
“मनाला शांती आणि समाधान लाभलं“
साईबाबांवर आपली निस्सीम श्रद्धा असल्याचे सांगताना अजित कुमार भावूक झाला होता. तो म्हणाला, “मी अनेक वर्षांपासून शिर्डीला येत असतो, मात्र गेल्या चार वर्षांपासून काही कारणांमुळे मला साईदर्शनासाठी येणं शक्य झालं नव्हतं. आज पुन्हा एकदा साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाल्याने माझ्या मनाला खूप समाधान आणि शांती मिळाली आहे. साईबाबांनी मला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची शक्ती द्यावी, अशीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी केली आहे.”
घरातील देवघरात होणार साईबाबांची स्थापना
या भेटीदरम्यान एक विशेष योगायोग जुळून आला. अजित कुमारने आपली एक इच्छा व्यक्त करताना सांगितले की, “माझ्या घरामध्ये सर्व देवी-देवतांच्या मूर्ती आहेत, पण साईबाबांची मूर्ती नव्हती. मी मनाशी ठरवलं होतं की, यावेळी शिर्डीतून जाताना बाबांची मूर्ती सोबत घेऊन जायची. मात्र, मी विकत घेण्यापूर्वीच संस्थानच्या वतीने मला मूर्ती भेट देण्यात आली. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असून, हीच मूर्ती मी आता माझ्या घरातील देवघरात स्थापित करणार आहे.”
दुबईतील थरारानंतर थेट शिर्डीत
अजित कुमारची ही शिर्डी भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण नुकताच तो एका मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर पडला आहे. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाुळे आखाती देशांमधील विमान वाहतूक विस्कळीत झाली होती. या युद्धजन्य परिस्थितीमुळे अजित कुमार अनेक दिवस दुबईत अडकून पडला होता. १० मार्च रोजी तो दुबईहून चेन्नईला सुखरूप परतला. या संकटातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर त्याने साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी शिर्डी गाठली.





