संगमनेर । झुंझार न्यूज

पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने उंबरी बाळापूर येथील मुस्लिम बांधवांसाठी फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले. विखे पाटील यांच्या या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले असून मुस्लिम समाज बांधवांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.
नामदार विखे पाटील यांनी आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत, मतदारसंघातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे. रमजानच्या पवित्र उपवासाच्या काळात मुस्लिम बांधवांना सुसह्य व्हावे, या भावनेतून त्यांनी खास उंबरी बाळापूर येथील बांधवांसाठी हे साहित्य पाठविले होते.
या साहित्याचे वाटप पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ पाटील भुसाळ आणि कारखान्याचे विद्यमान संचालक रंगनाथ भाऊराया पाटील उंबरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम बांधवांना सन्मानपूर्वक फराळ साहित्याचे संच सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी रामभाऊ भूसाळ म्हणाले की, विखे पाटील कुटुंबियांचे सर्व धर्मीय बांधवांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सण-उत्सव कोणतेही असोत, समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालण्याची ना. विखे पाटील यांची कार्यपद्धती आहे. याच भावनेतून हे फराळ साहित्य पोहोचवण्यात आले आहे.
या वाटप प्रसंगी युवक कार्यकर्ते गणेश पाटील भुसाळ, संपत भुसाळ, सुरेश भुसाळ, विलास उंबरकर यांसह गावातील मान्यवर आणि मुस्लिम समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदार विखे पाटील यांच्या या संवेदनशील निर्णयाबद्दल उंबरी बाळापूर ग्रामस्थांनी आणि मुस्लिम बांधवांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.




