संगमनेर । झुंझार न्यूज
सहकार, समाजकारण आणि लोकसेवा या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने एक वेगळा ठसा उमटवणारे, जनसामान्यांचे कैवारी सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात यांची १८ वी पुण्यतिथी. या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात आणि सहकार क्षेत्रात त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात येत आहे. त्यांनी दिलेला ‘सहकारमंत्र’ आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि सामाजिक बांधिलकीला दिशा देणारा ठरत असल्याचे राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख म्हणाले .

रणजितसिंह देशमुख पुढे म्हणाले की , भाऊसाहेब थोरात यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील तळागाळातील माणसाच्या उन्नतीसाठी वेचले. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी केवळ संस्था उभ्या केल्या नाहीत, तर त्या संस्थांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांच्या जीवनात समृद्धी आणली. त्यांचे कार्य आजही नव्या पिढीसाठी एखाद्या प्रेरणादायी दीपस्तंभासारखे आहे. केवळ नफा कमावणे हा सहकाराचा उद्देश नसून, समाजाचा सर्वांगीण विकास करणे हा विचार त्यांनी रुजवला.

भाऊसाहेब थोरात यांनी दिलेल्या विचारांची शिदोरी आजही तितकीच ताजी आणि मार्गदर्शक वाटते. त्यांनी आखून दिलेल्या कार्यमार्गावर चालताना आजही अनेकांना अभिमान आणि प्रेरणेची प्रचिती येते. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज अनेक सहकारी संस्था शिखरावर पोहोचल्या आहेत.

भाऊसाहेब थोरात दादाच्या स्मृतींना अभिवादन करताना, त्यांनी जोपासलेला हा अमूल्य वारसा आता तरुण पिढीने पुढे नेणे गरजेचे आहे. सहकार क्षेत्राला आधुनिकतेची जोड देत त्याला नवी दिशा, बळ आणि उंची देण्याची जबाबदारी युवकांनी खंबीरपणे पार पाडावी, हेच त्यांना अपेक्षित होते. युवकांचा सहकार क्षेत्रातील सहभाग आणि त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी हीच दादांना दिलेली खरी ‘आदरांजली’ ठरेल, असे सूर आजच्या अभिवादन सभेत उमटले.

भाऊसाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध सहकारी संस्था, सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. “सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी विनम्र अभिवादन” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा अखंडपणे पुढे नेण्याचा संकल्प आम्ही केला असल्याचे शेवटी म्हणाले .
